राधाकृष्ण विखे पाटलांना केले काँग्रेसने स्टार प्रचारक

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – राजकीय वैराचा जबरदस्त फटका बसलेल्या राधाकृष्ण विखे पाटलांना काँग्रेसने पुन्हा एकदा प्रकाश झोतात आणले आहे. काँग्रेने आपल्या प्रचारकांच्या यादीत राधाकृष्ण विखे पाटील यांचा समावेश करून त्यांना सन्मान देण्याचा प्रयत्न केला आहे. राधाकृष्ण यांचे पुत्र सुजय विखे हे भाजपमध्ये गेल्यापासून राधाकृष्ण विखे पाटील काँग्रेसच्या कार्यक्रमाला जाणे पसंत करत नाहीत अशातच त्यांच्यावर पक्षाने स्टार प्रचारकाची जबाबदारी टाकल्याने याबाबत राजकीय वर्तुळात उलट सुलट चर्चांना उत आला आहे.

काँग्रेसने जाहीर केलेल्या स्टार प्रचाराकांच्या यादीत राधाकृष्ण विखे पाटील यांच्यासह काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण आणि अमिता चव्हाण या पतिपत्नीचा समावेश आहे. त्याच प्रमाणे या यादीत पृथ्वीराज चव्हाण, बाळासाहेब थोरात, मुकुल वासनिक, भाई जगताप, राजीव सातव, विलास मुत्तेमवार, मिलींद देवरा, संजय निरुपम, विश्वजीत कदम आदी महाराष्ट्रातील नेत्यांचा समावेश आहे.

राधाकृष्ण विखे पाटील यांचे पुत्र सुजय विखे पाटील भाजपच्या तिकिटावर अहमदनगर दक्षिण या लोकसभा मतदारसंघातून लोकसभा निवडणूक लढत आहेत. त्यांच्या विरोधात राधाकृष्ण विखे पाटील प्रचार करणार का हे देखील पाहण्यासारखे राहणार आहे.