दहशतवाद्याच्या यादीवरून भारताचा हल्लाबोल; पाकिस्तानवर केले ‘हे’ आरोप

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – 26 /11 च्या मुंबई दहशतवादी हल्ल्यातील (Mumbai Terror Attack) दहशतवाद्यांच्या नावाची यादी (list-of-terrorists)पाकिस्तानने प्रसिद्ध केली आहे. पाकिस्तानने (Pakistan) जारी केलेल्या दहशतवाद्यांच्या यादीसंदर्भात भारताने पाकिस्तानवर जोरदार हल्लाबोल केला आहे. या यादीत या हल्ल्याचा मास्टरमाइंड आणि प्रमुख षडयंत्रकारी असलेल्या दहशतवाद्यांची नावे वगळली आहेत, असा आरोप भारताने पाकिस्तानावर केला आहे.

पाकिस्तान मुंबई हल्ल्याबाबत आपल्याला आंतरराष्ट्रीय वचनबद्धतेपासून दूर पळण्यासाठी खोट्या कहाण्या, खोट्या रणनीती आखत असून हे पाकिस्तानने सोडून द्यावे, असे भारत सातत्याने सांगत आल्याचे भारताचे परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते अनुराग श्रीवास्तव यांनी प्रतिक्रिया देताना म्हटले आहे. पाकिस्तान फेडरल इन्व्हेस्टिगेटिव्ह एजन्सीने अद्ययावत केलेल्या मोस्ट वॉण्टेड आणि हाय प्रोफाइल दहशतवाद्यांच्या यादीबाबतच्या बातम्या पाहिलेल्या आहेत. यात मुंबई हल्ल्यात सहभाग असलेल्या बहुतेक दहशतवाद्यांची नावे नमूद आहेत, असे श्रीवास्तव म्हणाले. या यादीत लश्कर-ए-तोयबाच्या काही दहशतवाद्यांची नावे आहेत. यात मुंबई हल्ल्यात वापरलेल्या बोटींच्या क्रू मेंबर्सचीदेखील नावे आहेत. मात्र, या यादीत या दहशतवादी हल्ल्याचा मास्टरमाइंड आणि षडयंत्रकारी असलेल्या दहशतवाद्यांची नावे मात्र वगळल्याचे दिसून आल्याचे श्रीवास्तव म्हणाले. मुंबई हल्ल्याची योजना आणि तो घडवून आणण्याची प्रक्रिया पाकिस्तानातूनच झाल्याचे परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्त्याने सांगितले. या यादीवरून असे स्पष्ट होत आहे की, पाकिस्तानला या हल्ल्यातील सहभाग असलेल्या दहशतवाद्यांची माहिती आहे, तसेच पुरावेदेखील उपलब्ध होत असल्याचे ते म्हणाले.

यादीत काय आहे ?
मिळालेल्या माहितीनुसार, या यादीत मुंबई हल्ल्याशी संबंधित 19 दहशतवाद्यांची नावे आहेत. खरे तर पाकिस्तानने गुरुवारी 1210 मोस्ट वॉण्टेड दहशतवाद्यांची नावे प्रसिद्ध केली आहेत. या यादीत लंडनमध्ये राहणारा मुत्ताहिदा कौमी मूव्हमेंटचा (MQM) नेता अल्ताफ हुसेन आणि पाकिस्तान मुस्लिम लीग-नवाझचा (PML-N) कार्यकर्ता नासिर बट्ट याचेदेखील नाव आहे. ही यादी पीटीआयने पाहिलेली असून, यात 2008 च्या मंबई हल्ल्याशी संबंधित लोकांची नावे आणि पत्ते आहेत. यादीत दहशतवाद्यांची नावे, पत्ते आणि शेवटचा ज्ञात पत्ता नमूद आहे. या बरोबरच एखाद्या दहशतवाद्यावर इनाम घोषित केलेले असल्यास त्याचादेखील उल्लेख या यादीत आहे.