क्रिकेटपटूच्या घरात सिलिंडरचा स्फोट झाल्यानं पत्नी गंभीर जखमी

पोलिसनामा ऑनलाईन टीम – क्रिकेटपटूच्या घरात सिलिंडरचा स्फोट झाल्यामुळे त्याची पत्नी गंभीर जखमी झाली आहे. बांगलादेशचा सलामीवीर लिटन दास याची पत्नी देवश्री बिश्वास संचिता ही स्वयंपाकघरात चहा करत होती, त्यावेळी अचानक सिलिंडरचा स्फोट झाला. या स्फोटात तिचा हात भाजला आहे.

सिलिंडरमध्ये छिद्र असल्याने सिलिंडरचा स्फोट झाला. देवश्रीने कसाबसा स्वत:चा चेहरा भाजण्यापासून वाचवला. घटना घडली त्यानंतर तिला लगेचच रूग्णालयात घेऊन जाण्यात आले आणि तिच्यावर उपचार करून तिला घरी पाठवण्यात आले. देवश्री म्हणाली की सिलिंडरचा स्फोट झाल्यानंतर स्वयंपाक घरातील ट्रॉलीचा एक तुकडा तुटून माझ्या अंगावर उडाला. त्यामुळे मला दुखापत झाली. मी मरण अगदी जपळून पाहिले. माझ्यासाठी ही गोष्ट खूपच कठीण होती. मी जर माझा चेहरा हाताने झाकला नसता, तर पूर्ण चेहरा भाजला असता. या घटनेत माझे केस जळले, त्यामुळे ते कापावे लागले. आग माझ्या चेहर्‍यापर्यंत पोहोचली असती तर मात्र खूप विचित्र घटना घडू शकली असती.

लिटन दास आणि पत्नी देवश्री बिश्वास
2019 चा विश्वचषक सुरू होण्याआधी लिटन दासचा देवश्रीसोबत साखरपुडा झाला होता. विश्वचषक संपल्यावर त्यांनी लग्न केले. त्यामुळेच लिटन श्रीलंका दौर्‍यावर गेला नव्हता. लिटन दास बांगलादेशचा यष्टीरक्षक आहे. त्याने 2015 मध्ये भारताविरूद्धच्या सामन्यातून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते. बांगलादेशकडून लिटनने अद्याप 20 कसोटी, 36 एकदिवसीय आणि 29 टी 20 सामने खेळले आहेत. त्यात त्याने अनुक्रमे 859, 1079 आणि 636 धावा केल्या आहेत.

You might also like