ST बस – रिक्षा विहिरीत कोसळली, मृतांचा आकडा 11 वर

नाशिक/देवळा : पोलीसनामा ऑनलाइन – बस आणि अ‍ॅपे रिक्षाची समोरासमोर धडक होऊन झालेल्या भीषण अपघातातील मृतांची संख्या 11 झाली आहे. सर्व मृत व्यक्ती बसमधील प्रवासी आहेत. तर 19 जण अद्याप बेपत्ता असल्याची माहिती समोर आली आहे. अपघातातील मृतांची संख्या वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. कळवण आगाराची बस आणि रिक्षा यांच्यात समोरासमोर धडक झाल्यानंतर दोन्ही वाहने विहिरीत कोसळली. अपघाताची माहिती मिळताच अग्निशमन दल आणि पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असून मदतकार्य सुरु आहे.

मालेगाव येथून धोबीघाट मेशीकडे जात असताना या बसला अपघात झाला. कळवण डेपोची एसटी महामंडळाची उमराणे-देवळा बस आणि रिक्षाची समोरासमोर धडक झाली. बसचे टायर फुटल्याने बसने रिक्षाला धडक दिली. ही धडक एवढी भीषण होती की, अपघातानंतर बस रिक्षासह विहिरीत कोसळली. धोबीघाटजवळील देश-विदेश हॉटेल जवळ हा भीषण अपघात झाला आहे. बसमधील प्रवासी गंभीर जखमी झाल्याचे प्राथमिक वृत्त आहे. बसमध्ये किती प्रवासी होते याबद्दल अधिक तपशील मिळू शकला नाही.
घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दल आणि पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली.

घटनास्थळी बचाव कार्य सुरु आहे. बसची मागील काच फोडून प्रवाशांना बाहेर काढल जात आहे. पाच तासांच्या अथक प्रयत्नानंतर 5 क्रेनच्या मदतीने विहिरीतून बस बाहेर काढण्यात आली आहे. बसमध्ये 43 प्रवासी होते आणि यामध्ये 7 मुलांचा समावेश असल्याची माहिती समोर येत आहे. सध्या घटनास्थळी बचाव कार्य सुरु आहे. जखमी झालेल्या प्रवाशांना मालेगाव देवळा तर काहींना उमराणे येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.