जुन्नर : क्रिकेट खेळताना फलंदाजाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू (व्हिडीओ)

जुन्नर : पोलीसनामा ऑनलाइन –  क्रिकेट मैदानात क्रिकेट खेळत असताना एका खेळाडूचा हृदयविकाराचा झटका येऊन मैदानावर मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. या घटनेमुळे क्रिडा प्रेमींमधून हळहळ व्यक्त होत आहे. ही दुर्दैवी घटना पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यातील बोरी बुद्रुक जवळच्या जाधववाडी येथे घडली आहे. ही घटना कॅमेऱ्यात कैद झाली आहे. बाबू नलावडे (वय-47 रा. धोलवड, ता. जुन्नर) असे मृत्यू झालेल्या खेळाडूचे नाव आहे.

जुन्नर तालुक्यातील बोरी बुद्रुक जवळच्या जाधववाडी येथे स्वर्गीय मयुर चषक स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. दोन दिवसापासून या ठिकाणी क्रिकेटचे सामने सुरु आहेत. आज दुपारी ओझर संघ व जांबुत संघ यांच्यात सामना सुरु होता. ओझर संघाची बॅटिंग सुरु असताना नॉन स्ट्रईकवर उभ्या असलेल्या बाबू नलावडे हा अचानक मैदानावर हृदयविकाराचा तीव्र झटका येऊन कोसळला.

मैदानावरील खेळाडू आणि नागरिकांनी बाबू नलावडे यांना नारायणगाव येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी तपासून त्यांना मृत घोषीत केले. या घटनेमुळे क्रिकेट प्रेमींना मोठा धक्का बसला आहे. मयत बाबू नलावडे हे परिसरातील एक नामवंत खेळाडू होते. या घटनेमुळे तालुक्यात हळहळ व्यक्त केली जात आहे.