पशुधन पर्यवेक्षकांची रिक्त पदभरतीबाबत राज्य सरकारचा मोठा निर्णय

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – राज्यातील पशुसंवर्धन विभागातील पशुधन पर्यवेक्षकांची रिक्त पदे बाह्यस्त्रोतांद्वारे करण्याचा निर्णय पशुसंवर्धन विभागाने घेतला आहे. यासाठी महसूल विभागनिहाय विभागीय आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली निवड प्रक्रिया समितीची स्थापना करण्यात आली आहे. त्यामुळे राज्यात रिक्त 378 पदांपैकी पशुधन पर्यवेक्षकांची 262 पदे बाह्यस्त्रोतांद्वारे भरली जाणार आहेत.

ही पदे 11 महिन्यांच्या कालावधीसाठी कंत्राटी तत्त्वांवर भरण्यात येणार आहे. यासाठी दरमहा पंधरा हजार रुपये मानधन दिले जाणार आहे. याशिवाय इतर कोणतेही भत्ते किंवा सुविधा दिल्या जाणार नसल्याची माहिती पशुसंवर्धन विभागाचे अवर सचिव समीर सावंत यांनी प्रसिद्ध केलेल्या पत्रकात म्हटले आहे.

पुणे विभागातील पशुधन पर्यवेक्षकांची पदे भरण्यासाठी विभागीय आयुक्त सौरभ राव यांच्या अध्यक्षतेखाली निवड प्रक्रिया समिती स्थापन करण्यात आली आहे. या समितीमध्ये जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख, जिल्हा परिषदेचे कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांच्यासह सामाजीक न्याय अधिकारी, आदिवासी खात्याचे विभागीय अधिकार यांचा समावेश करण्यात आला आहे.

पशुसंवर्धन विभागाचे सहआयुक्त हे या समितीचे सदस्य सचिव असणार आहे. राज्यात 776 पदे मंजूर असून यापैकी 378 पदे रिक्त आहेत. सध्या राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये कोंबड्या आणि अन्य पक्षांना बर्ड फ्लू या विषाणूची लागण झाली आहे. त्यामुळे ही रिक्त पदे तातडीने भरण्यात येणार असल्याचे पशुसंवर्धन विभागाचे अवर सचिव समीर सांवत यांनी दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे.