लालकृष्ण अडवाणी प्रथमच सात दिवसांच्या गोवा भेटीवर

पणजी – वृत्तसंस्था – माजी उपपंतप्रधान आणि भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी हे प्रथमच एकूण सात दिवसांच्या गोवा भेटीवर येत आहेत. मुख्य म्हणजे लालकृष्ण अडवाणी हे 30 जानेवारीपर्यंत गोव्यात असणार आहेत. अडवाणी यांचे आगमन गुरुवारी (दि- 24 रोजी) सायंकाळी होईल.

समोर आलेल्या माहितीनुसार, अडवाणी हे आयुष्यात कधीच एवढे दिवस गोव्यात राहिलेले नाहीत. त्यांचा मुक्काम दोनापावला येथील राजभवनवर असणार असून लालकृष्ण अडवाणी यांची ही खासगी भेट असल्याचंही समजत आहे. विशेष म्हणजे लालकृष्ण अडवाणी यांची ही खासगी भेट असणार आहे शिवाय अडवाणी यांच्या सुरक्षेसाठीची सगळी तयारी गोवा पोलिसांकडून केली जात आहे. अडवाणी हे खासगी भेटीवेळी नेमक्या कोणत्या कौटुंबिक किंवा अन्य कार्यक्रमामध्ये भाग घेतील याची कल्पना गोवा सरकारच्या शिष्टाचार खात्याला किंवा अन्य यंत्रणोला देण्यात आलेली नाही. अडवाणी यांच्यासोबत गोवा भाजपचाही कोणताच कार्यक्रम ठरलेला नाही.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, यावेळी अडवाणी हे खासगी भेटीवर आहेत. ते राजभवनवर विश्रंतीही घेतील. राजभवनवर मुक्कामाची तयारी जोरात सुरू आहे. अडवाणी हे भाजपमध्ये प्रमुख भूमिकेत होते तेव्हा त्यांच्या अनेक सभा गोव्यात झालेल्या आहेत. त्यांच्या अनेक पत्रकार परिषदाही गोव्यात झालेल्या आहेत. त्यांच्या यात्राही गोव्यातून पार पडलेल्या आहेत. अडवाणी यांची भूमिका भाजपमध्ये राष्ट्रीय स्तरावर केवळ एका मार्गदर्शकाची आहे.

अरबी समुद्र व मांडवी नदीच्या संगमाच्या ठिकाणी वसलेल्या राजभवनवर निवास करणे  कुणालाही आवडते. उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू हे अलिकडील काळात दोनवेळा राजभवनवर राहून गेले आहेत.

दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी येत्या आठवड्यात गोव्यात नव्या मांडवी पुलाचे उद्घाटन करण्यासाठी यावे असा प्रयत्न गोवा सरकारने केला होता पण मोदी यांनी आपण येऊ शकत नाही असे कळविले आहे. पंतप्रधानांनी नुकताच दक्षिण गोव्यातील भाजप कार्यकर्त्याशी  व्हीडीओ कॉन्फरन्सद्वारे संवाद साधला. त्याचप्रमाणो ते येत्या 27 रोजी उत्तर गोव्यातील भाजप कार्यकर्त्याशी संवाद साधतील.