भाजप-सेनेत ‘या’ 12 जागांवरून वाद !

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – गेल्या अनेक दिवसांपासून भाजप-शिवसेना युतीला घेऊन अनेक तर्क समोर येताना दिसले. शिवसेनेने 13 ते 14 मंत्रिपदे मिळावीत असा प्रस्ताव भाजपला दिल्याची माहिती आहे. शिवसेना राज्य मंत्रिमंडळात मंत्रिपदे वाढवून घेण्याच्या प्रयत्नात आहे. सध्या युतीत काही जागांवरून वाद आहे असे दिसत आहे. यात एकूण 12 जागा आहे. पश्चिम महाराष्ट्रातील 6 जागा तर विदर्भातील 3-3 जागांचा यात समावेश आहे.

पश्चिम महाराष्ट्रात राष्ट्रवादीतील अनेक दिग्गजांची भाजपमध्ये इनकमिंग झाली आहे. त्यामुळे पश्चिम महाराष्ट्रात काही जागांवर भाजप दावा करत आहे. यात साताऱ्यातील माण, फलटण, पंढरपूर, अक्कलकोट या जागांवर भाजप इच्छुक आहे. शिवसेनाही या जागांसाठी आग्रही आहे.  माण, वाई, अक्कलकोट, पंढरपूर, फलटण, कागल या जागांसाठी दोन्ही पक्षात रस्सीखेच सुरु आहे. विदर्भातील देवडी, रिसोड, गोंदिया या जागांसाठीही भाजप आणि शिवसेनेत लढाई आहे. इतकेच नाही तर, मुंबईतील वडाळा, शिवाजीनगर, उल्हासनगर या तीन जागांवरूनही वाद सुरु आहे.

शिवसेनेला दोन तीन मंत्रिपदे देऊन 122 ते 124 जागा देण्याची तयारी भाजपने दर्शवली अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. परंतु 126 पर्यंत जागा आणि मंत्रिपदे वाढवून द्यावीत यासाठी शिवसेना आग्रही आहे. सध्या मोदींच्या मंत्रिमंडळात अरविंद सावंत हे एकमेव शिवसेनेचे कॅबिनेट मंत्री आहेत. दरम्यान शिवसेनेच्या प्रस्तावाला अद्याप भाजपचा होकार आलेला नाही.