Loan Moratorium Case : 2 वर्षांसाठी वाढवले जाऊ शकते मोरॅटोरियम, सॉलिसिटर जनरल यांनी SC मध्ये सांगितलं

नवी दिल्ली : सुप्रीम कोर्टाने मोरॅटोरियम प्रकरणात आज मंगळवारी पुन्हा सुनावणी केली आहे. कोर्टाने मोरॅटोरियम कालावधी दरम्यान व्याजावर घेतले जाणारे व्याज माफ करण्याच्या मागणीसाठी दाखल याचिकेवर सुनावणी केली आहे. सुनावणीच्या दरम्यान केंद्राचे सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनी कोर्टाला सांगितले की, लोन मोरॅटोरियम दोन वर्षांसाठी वाढवले जाऊ शकते. यावर सुप्रीम कोर्टाने म्हटले की, कोर्ट सॉलिसिटर जनरलद्वारे केंद्राकडून मोरॅटोरियम मुद्द्यावर आपले उत्तर दाखल केल्यानंतर प्रकरणाची सुनावणी करेल. यावेळी सर्व पक्षकारांची बाजू ऐकली जाईल.

 

यापूर्वी मागच्या मंगळवारी सुप्रीम कोर्टाने लोन मोरॅटोरियममध्ये व्याजावर व्याज घेण्याच्या प्रकारात सूट देण्याच्या मागणीसाठी दाखल याचिकेवर सुनावणी करताना केंद्राला फटकारले होते. कोर्टाने म्हटले होते की, हे प्रकरण मोठ्या कालावधीपासून लटकलेले आहे आणि केंद्राला याबाबतीत आपली भूमिका स्पष्ट करावी लागेल. केंद्र सरकारला सुनावत कोर्टाने म्हटले होते की, ही समस्याच तुमच्या लॉकडाऊनमुळे उत्पन्न झाली आहे. ही केवळ व्यवसायावर विचार करण्याची वेळ नाही, तर लोकांच्या दुर्दशेबाबत सुद्धा विचार केला पाहिजे.

टर्म लोनच्या ईएमआयवर मोरॅटोरियमचा कालावधी 31 ऑगस्ट 2020 ला समाप्त झाला आहे. मात्र, कोविड-19 मुळे कर्जदारांना दिलेली ही सवलत डिसेंबरपर्यंत सुरू ठेवण्याच्या मागणीबाबत सुद्धा सुप्रीम कोर्टात अनेक याचिका प्रलंबित आहेत. देशाच्या मुख्य न्यायालयाने या प्रकरणी शुक्रवारी दाखल एक ताजी याचिका सुद्धा स्वीकारली आहे. न्यायमूर्ती अशोक भूषण यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठाने शुक्रवारी व्हिडिओ कॉन्फरन्सिंग द्वारे सुनावणी करत अधिवक्ता विशाल तिवारींकडून दाखल याचिकेला मोरॅटोरियमबाबत अगोदरपासून प्रलंबित प्रकरणांसोबत जोडण्याचा आदेश दिला होता.