Sangli News : नाभिक समाजाच्या अडचणी दूर करा; आमदार पडळकर यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

विटा (सांगली): पोलीसनामा ऑनलाइन – नाभिक समाजाच्या ( barber community) अडचणी दूर करण्याबाबत भाजपाचे आमदार गोपीचंद पडळकर ( Gopichand Padalkar) यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिले आहे. सरकारच्या माध्यमातून कोणतीही योजना नाभिक समाजासाठी चालवली जात नाही. नाभिक समाजातील गरजूंना अल्पव्याजदराने १० ते १५ लाख रुपये कर्ज देण्यात यावे, अशी मागणी आमदार गोपीचंद पडळकर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे.

पडळकर यांनी पत्रात नमुद केले आहे की, या समाजासाठी श्रीसंत सेना महाराज आर्थिक विकास महामंडळाची निर्मिती करावी. तसेच या महामंडळासाठी स्वतंत्र आर्थिक तरतूद करून अनेक योजना कराव्यात. तसेच जावेद हबीब सारख्या अनेक मोठ्या ब्रँडेड सलूननी बाजारात प्रवेश केलाय. त्यामुळे खोके टाकून आपले पोट भरणाऱ्या सामान्य नाभिक व्यवसायिकांच्या पोटावर पाय आला आहे. अशा प्रतिकूल परिस्थितीत टिकून राहण्यासाठी त्यांना आर्थिक सहाय्य म्हणून कर्ज अत्यल्प व्याजदरात उपलब्ध करून देण्यात यावे. तसेच अद्ययावत नाभिकी व्यवसायाचे प्रशिक्षण मिळण्यासाठी प्रशिक्षण संस्थांचे जिल्हास्तरावर निर्माण करावे आणि त्या संस्थेमार्फत कार्यशाळा घेतल्या जाव्यात. नाभिक व्यवसाय करताना अनेक प्रकारच्या लोकांशी संपर्क येतो. त्यामुळे विविध आजार, रोग होण्याची शक्यता असते. त्यांना सरकारकडून २० लाखांचा वीमा संरक्षण मिळावा.

वयाची ६० ओलांडलेल्या नाभिकांच्या वैद्यकीय खर्चासह इतर खर्च वाढतो. सरकारकडून नाभिकांसाठी पेन्शन योजना सुरु करण्यात यावी. मनपा, नगरपंचायत, जिल्हापरिषद, ग्रामपंचायती, बस स्टँड आदी जागांवर जे गाळे काढले जातात तिथं नाभिक समाजातील व्यवसायीकांसाठी गाळे देण्यात यावेत. पन्हाळगडाच्या पायथ्याशी प्रति शिवाजी म्हणून ज्यांची इतिहासात ओळख आहे, असे शूरवीर शिवा काशीद यांचे स्मारक दुर्लक्षित आहे. येथे लाईट, पाणी अशा मुलभूत सोई नाहीत. हजारो पर्यटक दर्शनासाठी या समाधीस्थळी येतात परंतु गाईड नसलेच्या कारणाने पर्यटकांना योग्य ती ऐतिहासिक माहिती मिळत नाही. या ठिकाणी कायमस्वरूपी सुरक्षा रक्षकाची गरज आहे. तरी या मुलभूत सोई करण्यात याव्यात अशा अनेक मागण्या पडळकर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे.