पंजाब पालिका निवडणुक : सनी देओलचा लोकसभा मतदार संघ गुरदासपुरमध्ये BJP उमेदवाराला मिळाली अवघी 9 मते !

अमृतसर : कृषी कायद्यांविरोधात शेतकर्‍यांच्या सुरू असलेल्या आंदोलनादरम्यान पंजाबमध्ये झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत सत्ताधारी काँग्रेसला धडाकेबाज विजय मिळाला आहे, तर भारतीय जनता पार्टी आणि आम आदमी पार्टीला मोठा झटका बसला आहे. सनी देओलच्या लोकसभा मतदार संघात भाजपाच्या एका उमेदवाराला तर अवघी 9 मते पडली आहेत.

स्थानिक पालिका निवडणुकांच्या निकालानंतर विरोधकांकडून सत्ताधारी काँग्रेसवर निवडणुकीत गडबड केल्याचा आरोप केला जात आहे. गुरदासपुर नगर परिषदेच्या वार्ड क्रमांक 12 मधून भाजपा उमेदवार किरण कौर यांना अवघी 9 मते मिळाली आहेत.

निवडणुकीत जोरदार झटका बसल्यानंतर भाजपा उमेदवार किरण यांनी बनावट प्रकारे सही करणे आणि इव्हीएम बदलण्यासारखे गंभीर आरोप केले आहेत.

हस्ताक्षर सुद्धा बनावट : किरण कौर
किरण कौर यांनी दावा केला आहे की, एकट्या त्यांच्या कुटुंबात 15 ते 20 सदस्यांनी त्यांना मतदान केले होते परंतु केवळ 9 मते मिळाली.

काँग्रेसवर निशाणा साधत किरण कौर म्हणाल्या, काँग्रेसने आम्हाला फसवले आहे. आमच्या कुटुंबातून 15 ते 20 मते टाकण्यात आली होती. तर मला केवळ 9 मते मिळाली. आमच्या संपूर्ण लेनने मला मते देण्याचे आश्वासने दिले होते, परंतु मला कुणाचेही मत मिळाले नाही. आमचे हस्ताक्षर सुद्धा बनावट होते.

किरण कौर यांनी काँग्रेस नेत्यांवर त्यांच्या कुटुंबियांना त्रास देण्याचा सुद्धा आरोप केला आहे. किरण यांचे म्हणणे आहे की, आम्हाला काँग्रेसकडून त्रास दिला जात आहे. माझ्या पतीची गाडी हटवण्यात आली. मला शाळेतून सुद्धा काढण्यात आले.

भाजपा उमेदवाराने हा सुद्धा आरोप केला की, काँग्रेस नेत्यांनी त्यांना उमेदवारी सोडण्यास सांगितले होते.

त्यांनी म्हटले की, मी सोडण्यास नकार दिला. मी जिंकणार होते, परंतु त्यांनी रात्री मशीन बदलल्या आणि काँग्रेस पक्षाला मते टाकण्यात आली.