‘कोरोना’ स्थितीचा आढावा घेऊनच सर्वसामान्यांसाठी लोकलचा निर्णय; महापालिकेचे स्पष्टीकरण

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – मुंबईची लाइफलाइन असलेली लोकल सेवा (Mumbai Local Train) 15 डिसेंबरनंतरच्या मुहूर्तावर सर्वसामान्यांसाठी सुरू होण्याची चिन्हे असली तरी याबाबतचा निर्णय कोरोना परिस्थितीचा आढावा घेऊनच घेतला जाईल, असेही मुंबई महापालिका प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

महापालिकेच्या उपाययोजनांमुळे दिल्लीच्या तुलनेत मुंबईने कोरोनावर बऱ्यापैकी नियंत्रण मिळविले आहे. याच सकारात्मक बाबीमुळे 15 डिसेंबरनंतर सर्वसामान्यांसाठी लोकल सेवा सुरू करण्याबाबत प्रशासनाने तयारी सुरू केली आहे. आठवडाभरात होणाऱ्या बैठकीत याबाबत ठोस निर्णय घेतला जाईल. कोरोना स्थितीचा आढावा घेऊनच सर्वसामान्यांसाठी लोकल प्रवासाचा निर्णय घेतला जाईल, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.

आठवडाभरात बैठक
सूत्रांच्या माहितीनुसार, येत्या आठवडाभरात याबाबत बैठक होईल. या बैठकीला राज्य, महापालिका आणि रेल्वेचे अधिकारी उपस्थित राहतील. बैठकीत चर्चेअंती सर्वसामान्यांसाठी लोकल सुरू करण्याचा निर्णय होईल.

…त्यानंतर रेल्वे प्रशासनाला विनंती
15 डिसेंबरपर्यंत सामान्यांसाठी लोकल सुरू करण्याचा विचार आहे. तत्पूर्वी कोरोना स्थितीचा आढावा घेतला जाईल. एक ते दोन दिवसांत नेमकी काय स्थिती आहे हे पाहून त्यानंतरच रेल्वे प्रशासनाला विनंती केली जाईल. मात्र, याचा अर्थ 15 डिसेंबर किंवा त्यानंतर लोकल सर्वसामान्यांसाठी सुरू होतील, असा घेता येणार नाही, असे पालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी स्पष्ट केले आहे.