Coronavirus Lockdown : ‘लॉकडाऊन’मध्ये फिरायचं होतं म्हणून बनला ‘बोगस’ डॉक्टर, पोलिस समोर येताच झाली ‘पोलखोल’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – कोरोना व्हायरसचे संक्रमण रोखण्यासाठी देशात २१ दिवसांचा लॉकडाऊन असून २५ मार्चपासून सुरु झालेला हा लॉकडाऊन १४ एप्रिलपर्यंत चालणार आहे. लॉकडाऊनमुळे देशातील प्रत्येक हालचाली थांबल्या आहेत. लोकांना घरातून बाहेर येण्यास बंदी आहे, जर अत्यावश्यक काम असेल तरच लोकं बाहेर पडू शकतात. पोलीस काटेकोरपणे या नियमाचे पालन लोकांकडून करवून घेत आहेत.

पकडला गेला डॉक्टर
काही लोकं तर असेही आहेत जे वेगवेगळी कारणे काढून हा नियम मोडत आहेत. तसेच काही लोकं नवनवीन युक्त्या काढत आहेत. नोएडामध्ये एका व्यक्तीने अशीच एक युक्ती केली. केवळ डॉक्टर उपचारासाठी एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाऊ शकतात, त्यामुळे ही व्यक्ती बनावट डॉक्टर बनली. त्याने मास्क लावले आणि डॉक्टरांचा पांढरा पोशाख घातला आणि नोएडामध्ये निर्भीडपणे फिरू लागला.

जेव्हा झाला पोलिसांचा सामना
रस्त्यावरील तफरीच्या वेळी या व्यक्तीचा थोड्याच वेळात पोलिसांशी सामना झाला. पोलिसांनी बाहेर पडण्याचे कारण विचारले असता त्याने स्वतःला डॉक्टर असल्याचे सांगितले. पण पोलिसांनी त्याच्या लबाडीला ओळखले आणि त्याचा खोटेपणा समोर आला. पोलिसांनी आणखी काही प्रश्न विचारले तेव्हा ते घाबरू लागले.

त्याने सगळे सत्य सांगत म्हटले की, त्याने फिरण्यासाठी डॉक्टरांचा पोशाख घातला आहे. सध्या तरुणाला पोलिसांनी ताब्यात घेतले असून गुन्हा दाखल करत पुढची कारवाई करत आहेत.

मरण्याचे नाटक करत ऍम्ब्युलन्समधून चालले होते घरी
लॉकडाऊनमध्ये पोलिसांना चकमा देण्यासाठी लोकं वेगवेगळी पद्धत वापरत आहेत. जम्मू-काश्मीरमध्ये चार लोकांनी घरी जाण्यासाठी एक अनोखी युक्ती वापरली आहे. यात एक जण मरण्याचे नाटक करत ऍम्ब्युलन्समध्ये डेड बॉडी बनतो आणि तीन जण त्याला घेऊन घरी जाऊ लागतात. पण इथेही पोलिसांच्या चौकशी दरम्यान हे चार लोकं पकडले गेले आहेत.