Lockdown 3.0 : पुण्यात 10 लाख नागरिकांनी केला पास मिळण्यासाठी अर्ज : पोलीस आयुक्त

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – शहर पोलीस दलातील 11 पोलिसांना कोरोनाची लागण झाली आहे. तर एका कर्मचाऱ्याचा मृत्यू झाला आहे. त्यांना कोरोना लागण कोठून झाली याचा अभ्यास करण्यात आला आहे. त्यात या पोलीस कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण ही घरातून किंवा घराच्या परिसरात झाली आहे. कर्तव्यावर असताना त्यांना लागण झालेली नाही, अशी माहिती पोलीस आयुक्त डॉ. के. व्यकंटेशम यांनी दिली.

कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर आज जिल्हाधिकारी कार्यालयात विभागीय आयुक्त डॉ दीपक म्हैसकर, जिल्हाधिकारी नवल किशोर राम आणि पोलीस आयुक्त डॉ के. व्यंकटेशम यांची पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी ते बोलत होते.

डॉ. व्यंकटेशम म्हणाले, पुणे पोलीस दलातील 11 पोलिसांना कोरोनाची लागण झाली आहे. एका कर्मचाऱ्याचा मृत्यू झाला आहे. या कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण ही कर्तव्यावर असताना झालेली नाही. त्यांना कोरोना हा घरातून किंवा घराच्या परिसरात बाहेर गेल्यानंतर झाला असावा. त्यांना कोरोनाची लागण कुठे झाली याचा अभ्यास करण्यात आला आहे. त्यात हे समोर आले आहे.
दरम्यान या काळात कर्तव्य बजावत असताना पोलिसांनी नेमकी काय काळजी घेतली पाहिजे तसेच नागरिकांशी संपर्क आल्यानंतर त्यांनी कोणती काळजी घ्यावी याबाबत ससून रुग्णालयातील डॉक्टरांनी माहितीपर मार्गदर्शन केले आहेत.

शहरात 10 लाख नागरिकांनी पासेससाठी अर्ज केले आहेत. तसेच आता पर्यंत 1219 विद्यार्थ्यांना घरी जाण्यासाठी परवानगी दिली असून, ते घरी पोहचले आहेत. तर अजून 2 हजार विद्यार्थ्यांनी घरी जाण्यासाठी अर्ज केले असून, त्यांना घरी पाठविण्याचे काम सुरू केले आहे.

परराज्यातील मजुरांना त्यांच्या गावी जाण्यासाठी परवानगी दिल्यानंतर पोलिस ठाणे स्थरावर त्यांची नोंदणी केली जात आहे. दोन दिवसात शहरात 28 हजार मजुरांनी नोंदणी केल्या आहेत.

शहरातील गुन्हेगारीत मोठ्या प्रमाणात घट झाली आहे. गेल्या वर्षी (2019) एप्रिल महिन्यात 28 हजार कॉल आले होते. त्यात गुन्हेगारी बाबत सर्वाधिक कॉल होते. या वर्षी देखील 20 हजारहून अधिक कॉल नियंत्रण कक्षाला आले आहेत. पण त्यात सर्वाधिक कॉल हे मदतीसाठी आले आहेत, असे देखील यावेळी पोलीस आयुक्त डॉ. के. व्यंकटेशम यांनी सांगितले.