… म्हणून हडपसरमध्ये फिटनेसचं प्रमाणपत्र घेण्यासाठी मजूरांमध्ये गोंधळ

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – परराज्यातील मजुरांसाठी गावी जाण्यासाठी covid19.mhpolice.in urवेबसाईट सुरू केली असून, त्यावर नाव, पत्ता, फोटो, फ्लू फिटनेस सर्टिफेकट जोडायचे आहे. त्यासाठी फ्लू फिटनेस सर्टिफिकेट घेण्यासाठी हडपसरमधील महापालिकेच्या अण्णासाहेब मगर रुग्णालयात गर्दी केली. दोन दिवस सर्टिफिकेट मिळेल, असे सांगितले जात होते. मात्र, आज सकाळी फ्लू फिटनेस सर्टिफिकेट ससून रुग्णालयात मिळेल, असा फलक लावल्यामुळे मजूरवर्गाचा गोंधळ उडाला आहे.

हडपसरमध्ये परराज्यातील हजारो कुशल आणि अकुशल असा मजूरवर्ग मोठ्या प्रमाणावर आहे. बहुतेक मजूरवर्ग अशिक्षित आहे. त्यामुळे त्यांना वेबसाईट किंवा इतर तांत्रिक बाबी कळत ऩाहीत. त्यामुळे त्यांची मोठी अडचण झाली आहे. कोरोना विषाणूच्या भीतीमुळे त्यांना गावाकडे जाण्यासाठी घाई झाली आहे. परराज्यातील मजूरवर्ग गावाकडे जाऊ देण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारने तयारी दर्शविली आहे. त्यामुळे मजूरवर्गाच्या चेहऱ्यावर हसू उमलले. मात्र, त्यासाठी आवश्यक प्रक्रिया करताना त्यांना प्रशासनाचे उंबरे झिजवावे लागत असल्याने मेटाकुटीला आले आहेत.

परराज्यातील मजूर शहर आणि उपनगरामध्ये अडकले आहेत. मागिल तीन-चार दिवसांपासून फ्लू फिटनेस सर्टिफिकेट मिळविण्यासाठी हडपसरमधील मजूरवर्ग मगरपट्टा चौकातील महापालिकेच्या अण्णासाहेब मगर रुग्णालयामध्ये चकरा मारत आहे. आज भल्या पहाटे फ्लू सर्टिफिकेट मिळविण्यासाठी रांग लावली. मात्र, येथे सर्टिफिकेट मिळत नाही, तुम्ही ससून रुग्णालयात जावा. तसेच येथे बंदोबस्तासाठी पोलीस यंत्रणाही तैनात केली आहे.

परराज्यातील हजारो मजूर वर्ग हडपसरमध्ये स्थायिक झाला आहे. तो आता गावी जाण्यासाठी धडपड करत आहे. त्यातच शासनाने हिरवा कंदिल दाखविल्यामुळे त्यांच्याही आशा पल्लवीत झाल्या आहेत. पालिकेच्या रुग्णालयातून फ्लू फिटनेस सर्टिफिकेट घेण्यासाठी मजूरांनी हडपसरमधील मगर रुग्णालयामध्ये चकरा मारण्यास सुरुवात केली. मात्र, आज सकाळी अचानक येथे फ्लू सर्टिफिकेट मिळणार नाही, त्यासाठी तुम्हाला ससून रुग्णालयामध्ये जावे लागेल असा फलक लावला. त्यामुळे हडपसरमधून हजारो मजूर ससून रुग्णालयापर्यंत कसे जाणार असा प्रश्न पडला आहे. पीएमपी बसेस बंद आहेत. त्यामुळे महापालिका आयुक्तांनी तातडीने निर्णय घेऊन ज्या त्या विभागातील महापालिकेच्या रुग्णालयातून त्यांना फ्लू सर्टिफिकेट देण्याची व्यवस्था करावी, अशी मागणी मजूरवर्गाकडून केली जात आहे.

वारजे माळवाडी येथे पुलाखाली मजूरवर्गाची प्रचंड गर्दी झाली. ती पांगविण्यासाठी अखेर पोलिसांना लाठीचार्जही करावा लागला. मजूर वर्ग गावाकडे जाण्यासाठी तडफडत आहे. केंद्र आणि राज्य सरकारने त्यांना गावी जाण्यासाठीचा मार्ग खुला केला. मात्र, तहसीलदारांकडे रीतसर फॉर्म भरण्याचे आवाहन केले. त्यानुसार ते तहसीलदारांकडे गेल्यानंतर त्यांनी पोलीस स्टेशनला पाठविले. त्यामुळे मजूर वर्गाचा मोर्चा अखेर पोलीस स्टेशनकडे वळला आणि पोलीस स्टेशनसमोर एकच गर्दी झाली. ही गर्दी हटवता हटवता पोलिसांनाही नाकीनऊ आले आहेत.

मायदेशी परदेशात अडकले म्हणून त्यांना विमानाची सोय करून कोरोनासह मोफत आणले. मात्र, आमच्या देशामध्ये राज्य-परराज्यात मजूर अडकले आहेत. खेड्यापाड्यातून रोजगारासाठी शहरात आले आहेत. कोरोनाच्या भीतीने मजूर मात्र लेकराबाळांना घेऊन पायपीट गाव गाठताना दिसत आहेत. अन्न-पाण्याचा टाहो फोडत उन्हाचा चटका सोसत कोसो दूर मजूर वाट तुडवत जाताना दिसत आहे.