पुण्यातील हडपसर परिसरात ट्रॅक्टर, छोटा टेम्पो, मोटारसायकलला कॅरेट लावून भाजीपाला विक्री सुरू

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – कोरोना व्हायरसचा संसर्ग रोखण्यासाठी देशात 24 मार्चपासून पहिले लॉकडाऊन झाले आणि भाजीपाला खरेदी करण्यासाठी नागरिकांची एकच गर्दी उसळली. हीच संधी साधत बेरोजगारांनी भाजीपाला विक्रीचा व्यवसाय सुरू केला. पोलिसांचा ससेमिरा मागे लागताच भल्या माणसांनी आपण शेतकरी असल्याचा बुरखासुद्धा पांघला आहे. ट्रॅक्टर, छोटा टेम्पो, मोटारसायकलला कॅरेट लावून भाजीपाला विक्री सुरू केली.

हॉटेल, ढाबे, मेस, छोटेखानी खानावळीसुद्धा बंद झाल्या. त्यामुळे तेथे काम करणाऱ्यांसह मेस आणि खानावळचालकांनी आपला मोर्चा भाजीविक्री व्यवसाय करण्याकडे वळवला. इथे थांबला तो संपला म्हणतात, त्याप्रमाणे त्यांनी लगेच मार्गही बदलला. मात्र, कोरोना व्हायरसच्या संसर्गाची साखळी तोडण्यासाठी घरात थांबणे महत्त्वाचे आहे. घरात थांबणे सगळ्यांनाच आवडते. मात्र, पोट कसे भरायचे हा प्रश्न अनेकांना सतावत आहे. त्यामुळे त्यांनी लगेच पर्यायी मार्ग शोधल्याचे हडपसरमधील राजेंद्र राऊत यांनी सांगितले.

भल्या पहाटे म्हणण्यापेक्षा मध्यरात्रीपासून सोलापूर रस्त्यावर कवडीपाट टोलनाला ते लक्ष्मी कॉलनी दरम्यान भाजी मार्केटच भरत आहे. गस्तीवरील पोलीस डोळ्यात तेल घालून गर्दी पांगविण्याचा प्रयत्न करीत असले, तरी त्यांच्या प्रयत्नांना अपय़श येत आहे. पोलीस आल्याचे समजताच ही मंडळी सोलापूर रस्त्यालगतच्या सर्व्हिस आणि अंतर्गत गावाकडे जाणाऱ्या रस्त्यावर वाहने दामटत आहेत. चार-दोन पोलीस बिचारे धावणार तरी किती असा प्रश्न पडला आहे.

भल्या भल्या गुंडांना जेरबंद करण्यात हातखंडा असलेल्या पोलिसांनी शेतकऱ्यांचा बुरखा पांघणाऱ्यांनाही शोधून काढलेच. सुतावरून स्वर्गात जाता येत नसले तरी छोट्याशा पुराव्यावरून गुन्हेगारांना जेरबंद करणाऱ्या पोलिसांचा आम्हाला अभिमानच आहे. रात्रंदिवस तुमच्या-आमच्यासाठी नागरीवस्ती आणि रस्त्यावर गस्त घालणाऱ्या पोलिसांना त्रिवार सलामच ठोकला पाहिजे.

कोरोना व्हायरसची भीती दिवसेंदिवस काळजाला जाऊन भिडू लागली आहे. त्यामुळे गाववाल्यांसह शहर-उपनगरातील गल्लीबोळही काठ्या, फ्लेक्स, बॅरिगेट लावून बंद केले आहेत. मात्र, हीच मंडळी मुख्य रस्त्यावर बिनधास्त हुंदडताना दिसत आहेत. आपल्या दारात कोणी आले नाही पाहिजे. आम्ही बिनधास्त तुमच्याकडे येणार अशीच काहीशी नागरिकांची भावना झाली आहे.

खुल जा सिम सिम

लॉकडाऊनच्या तिसऱ्या टप्प्यात खुल जा सिम सिम म्हणत एकदाची मद्यविक्रीची दुकाने उघडली. मद्यखरेदीसाठी दिवसभर रांगल्याचे चित्र अनेकांनी पाहिले आहे. पोलिसांनीही नेमकी हीच संधी साधून अनेक मद्यविक्री करणाऱ्या दुकानमालकावर गुन्हे दाखल केले. किरकोळ प्रकार वगळता दिवसभरात मद्यप्राशन करून राडा केल्याचे ऐकिवात आले नाही. सोमवार (शंकराचा वार) असल्यामुळे अनेकांनी मांसाहार टाळला, हीसुद्धा एक जमेची बाजू आहे, असे म्हणायला हरकत नाही.