Lockdown 3.0 : दारूच्या दुकानांपुढं रांगा अन् स्वीटहोमकडे पाठ, मद्यपी ‘झिंगाट’

पुणे :  पोलीसनामा ऑनलाइन  –  कोरोनाची महामारी रोखण्यासाठी लॉकडाऊन केले आणि त्यामध्ये आता शिथीलता आणली आहे. त्यामुळे पहिल्यांदा मद्यप्रेमींची खरेदीसाठी झुंबड उडाली, इतर दुकानांकडे म्हणजे स्वीटहोमकडे कोणीही फिरकले नाही. घरामध्ये किंवा सार्वजनिक पेढे वाटून आनंद साजरा करण्याचा क्षण हृदयाच्या कप्प्यात साठवून ठेवला जातो. पेढा खाल्ल्यानंतर तोंड गोड होणार आणि चेहऱ्यावरचा आनंद खुलणार. मात्र, मद्य पिताना डोळे झाकणार आणि थोड्या वेळात जमिनीवर लोळणार, हे सांगण्यासाठी कोणा भविष्यवेत्त्याची गरज नाही.

परीक्षेतील यश, नोकरी, प्रमोशन, घरखरेदी, लग्न, वाढदिवस, अपत्य अशा एक ना अनेक आनंदाच्या क्षणी आपण पेढे वाटून आनंद साजरा करतो. नव्ही ही तर आपली संस्कृती आहे. अलीकडे मित्रमंडळींमध्ये मात्र पार्टी नावाचे फॅड आले आहे, त्यामध्ये ओल्या-सुक्या सुक्या पार्ट्यांचा सुकाळ वाढला असे म्हटले तर वावगे ठरणार नाही.

मागिल दोन दिवसांपासून स्वीट होमसुद्धा उघडली गेली आहेत. स्वीट होममध्ये खरेदीसाठी कोणी फिरकत नसल्याचे दिसत आहे. मात्र, मद्यखरेदीसाठी दुकाने उघडण्याअगोदर रांगा लागल्या आहेत, हे भीषण वास्तव आता स्वीकारण्याची वेळ आली आहे. मद्यपी वर्ग फार मोठा नाही. मागिल 45 दिवसांपासून दारूदुकाने बंद असल्याने गर्दी झाली आहे. ती हळूहळू ओसरेल मात्र संपणार नाही, हेसुद्धा सत्य आहे.

कोरोना व्हायरसच्या विषाणूचे महाभयंकर संकट जगावर कोसळले. भारतामध्येही त्याचा शिरकाव झाल्यामुळे 22 मार्च रोजी जनता कर्फ्यू पाळला आणि त्यानंतर लगेच दोन दिवसांनी म्हणजे 24 मार्च रोजी देशभर लॉकडाऊन केले. त्यातून अत्यावश्यक सेवा वगळल्या गेल्या. 21 दिवसांच्या लॉकडाऊननंतर संसर्ग आटोक्यात येत नसल्याचे दिसताच पुन्हा सात दिवस आणि त्यानंतर लगेच 17 मेपर्यंत म्हणजे तिसऱ्यांदा लॉकडाऊन केले. तरीसुद्धा महामारी काही थांबेना.

दरम्यान, अलिबाबा 40 चोर या गोष्टीप्रमाणे मद्यपिंसाठी खुल जा सिम सिम म्हणत दारूविक्रीची दुकाने सुरू केली. ही वार्ता वाऱ्यासारखी पसरली आणि मद्यपिंच्या आनंदाला पारावारच उरला नाही. भल्या पहाटेपासून केव्हा एकदा दारू दुकाने उघडाहेत असे झाले. त्यासाठी दुकान उघडण्याअगोदरपासून रांगा लागल्याचे चित्र सर्वत्र झळकू लागले. गर्दी गोंगाट सुरू झाला. त्यानंतर पुन्हा इतरही बाबतीत लॉकडाऊनमध्ये शिथिलता आणली. त्यामुळे रस्त्यावर वर्दळ वाढली. मात्र, त्याचा परिणाम पोलिसांच्या कसून चौकशीवर झाल्याचे दिसून आले.

मद्यप्रेमींनी तर रोजंदारीवर मद्यखरेदी करण्यासाठी मंडळी नेमली. त्यामुळे बेरोजगारांना रोजगार मिळाला आणि मद्यपिंना मद्य मिळाले. पोलिसांचा ससेमिराही चुकला, मित्रांनाही मद्यखरेदी केल्याची माहिती नाही, असा तिहेरी संगम या मद्यप्रेमींनी साधल्याचे चित्र पाहायला मिळाले. त्यात तोंडाला मास्क किंवा रूमाल बांधल्यामुळे सहजासहजी व्यक्ती ओळखही होत नाही, हीसुद्धा त्यांच्यासाठी जमेची बाजू आहे, असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. कोरोनामुळे काही बेरोजगारांना रोजगार मिळाला असे म्हणणे योग्य ठरणार नाही.

हडपसर पोलीस स्टेशनपासून हाकेच्या अंतरावर आणि चेकपोस्टच्या समोर खुलेआम दारू खरेदीसाठी गर्दी झाली. गडबड गोंधळ झाला तर दारू दुकाने बंद होतील म्हणून मद्यपिंनी कोणतीही तक्रार न करता भर उन्हात रांगेमध्ये थांबणे पसंत केले. मागिल दीड पावणेदोन महिन्यापासून घसा कोरडा असल्याने बेचेन झाल्याची चर्चा मद्यप्रेमींमध्ये सुरू होती.

तुकाईदर्शन (फुरसुंगी, ता. हवेली, पुणे) येथील लोककल्याण प्रतिष्ठानचे अध्यक्ष राजाभाऊ होले म्हणाले की, कुटुंबामध्ये किंवा सार्वजनिक जीवनामध्ये आनंदाच्या क्षणी पेढे किंवा गोडधोड देवून तोंड गोड करण्याची आपली रुढी परंपरा आहे. अलीकड मित्रमंडळींमध्ये मात्र ओल्या सुक्या पार्ट्यांचा चंगळवाद सुरू झाला आहे, ही बाब समाजासाठी घातक आहे. नवी पिढी निकोप आणि संस्कारक्षण असली पाहिजे, अशी भावना समाजामध्ये पेरण्याची वेळ आली आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.