सवलती देण्याचा पुणे महापालिका आयुक्तांचा निर्णय चुकीचा : महापौर मुरलीधर मोहळ

पुणे :  पोलीसनामा ऑनलाइन  –   पुणे शहरात कोरोनाच्या रुग्णांची संख्या जास्त आहे. शहरामध्ये संचारबंदीपासून इतक्या मोठ्याप्रमाणात सवलती देण्याचा महापालिका आयुक्तांचा निर्णय चुकीचा आहे. यामुळे परिस्थिती बिघडू शकते. शहरात कोरोनाचे रुग्ण सापडत असताना नागरिकांना बाहेर फिरण्यास परवानगी देण्याचा निर्णय योग्य नाही. यासंदर्भात आपण पालकमंत्री अजित पवार यांच्याशी बोलणार असल्याचे पुणे महानगरपालिकेचे महापौर मुरलीधर मोहळ यांनी सांगितले.

पुण्यातील सर्व रस्त्यावर होणारी गर्दी चिंता वाढवणारी असल्याचे सांगत केवळ अत्यावश्यक सेवा, त्याही सकाळी 10 ते दुपारी 2 यावेळ असाव्यात असे त्यांनी म्हटले आहे. नव्या आदेशानुसार सकाळी 10 ते 6 वेळ असल्याने लोक दिवसभर बाहेर असू शकतात. यावर नियंत्रण कसे आणणार ? असा सवाल महापौर मोहळ यांनी उपस्थित केला आहे. सव्वा महिन्यात पुण्यातील परिस्थिती आटोक्यात आहे. यासाठी पोलीस, प्रशासन, आरोग्य अधिकारी यांनी प्रयत्न केले आहेत. त्यामुळे लॉकडाऊन पुर्वीप्रमाणेच सुरु ठेवण्याची मागणी त्यांनी केली आहे.

पहिले दोन लॉकडाऊन व्यवस्थित पाळल्याने आणि रुग्ण संख्या आटोक्यात येण्याची शक्यता असताना नवे आदेश पुणे शहराला परवडणारे नाहीत. आज हजारो नागरीक रस्त्यावर आल्याने आपला उद्देश सफल ठरता दिसून येत नाही. दरम्यान महापौर मुरलीधर मोहळ यांनी आज उडालेल्या गोंधळावरही त्यांनी नाराजी व्यक्त केली. दारुची दुकाने सुरु होणार असल्याने नागरिकांनी सकाळी सात पासून गर्दी केली. अशा प्रकारचे निर्णय आठ दिवसांपूर्वी का घेतले नाहीत, असाही सवाल त्यांनी केला आहे.

दारु खरेदी करण्यासाठी आलेल्या काही नागरिकांनी मास्क, रुमाल बांधून रांगेत उभे होते. तर शहरात काही ठिकाणी सोशल डिस्टन्सिकचे नियम पाळण्यात येत होते तर काही ठिकाणी हे नियम पादळी तुडवल्याचे पहायला मिळाले. त्यामुळे महापालिका आयुक्तांनी हा निर्णय मागे घ्यावा अशी मागणी आपण केली असल्याचे महापौर मुरलीधर मोहळ यांनी सांगितले.