IT कंपन्यांबाबत अजित पवारांनी दिले मोठे संकेत

पोलिसनामा ऑनलाईन – राज्यात कोरोनामुळे सुरु असलेला लॉकडाउनचा चौथा टप्पा आता संपणार आहे. त्यामुळे राज्य सरकारकडून काय उपाययोजना करता येतील, यासाठी आढावा घेतला जात आहे. त्यासाठी रेड झोन क्षेत्रात आणखी अटी शिथिल कराव्यात अशी आग्रही मागणी राष्ट्रवादीची असून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना याबद्दल सांगणार असल्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले आहे.

कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये म्हणून करण्यात आलेले लॉकडाउन संपल्यानंतर रेड झोन क्षेत्रात औद्योगिक आणि सामान्य जनजीवन सुरू करण्याबाबत काही निर्णय घ्यावे लागतील, अशी भूमिका उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मांडली. मुंबई एमएमआरडीए परिसर, पुणे, पिपंरी-चिंचवड रेड झोन क्षेत्रात चौथा लॉकडाऊन संपल्यानंतर अधिक अटी शिथिल कराव्या लागतील. गेल्या दोन महिन्यापासून राज्यातील व्यवहार ठप्प आहे. लोक ही अडकून पडली आहे. त्यामुळे फार काळ लोकांना लॉकडाउनमध्ये आता अडकवणे योग्य नाही. योग्य खबरदारी घेऊन रेड झोन क्षेत्रात पुन्हा कार्यरत व्हावे लागेल, असे मत अजित पवारांनी व्यक्त केले आहे.

राज्यात रेड झोन क्षेत्रात येत्या काळात अधिक खबरदारी घेत अटी शिथिल करून जास्त मुभा देणे गरजेचे आहे, अशी भूमिका मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे मांडणार आहे, अशी माहितीही अजित पवार यांनी दिली आहे. महाविकास आघाडी सरकारमधील प्रमुख मंत्री आणिराज्याचे मुख्य सचिव अजय मेहता तसेच आरोग्य नगर विकास ग्रामविकास वैद्यकीय शिक्षण या विभागाचे सचिव यांची वर्षा बंगल्यावर बैठक बोलावण्यात आली आहे. या बैठकीत सर्व जिल्ह्यात स्थानिक पातळीचा आढावा, औद्योगिक क्षेत्र पुन्हा सुरू करणे, रेड झोन क्षेत्रात रिलॅक्सेशन देणे यावर प्रामुख्याने चर्चा केली करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.