Lockdown 4.0 : कर्नाटकामध्ये महाराष्ट्रासह ‘या’ 4 राज्यातील लोकांना प्रवेश बंदी ! मात्र, राज्यात धावणार ‘रेल्वे-बस-टॅक्सी’, उघडणार सर्व दुकाने

बेंगलुरू : वृत्तसंस्था – कर्नाटक सरकारने महाराष्ट्र, केरळ, गुजरात आणि तामिळनाडू या राज्यातून येणाऱ्या लोकांना राज्यात प्रवेशावर बंदी घातली आहे. तर दुसरीकडे कर्नाटकचे मुख्यमंत्री बीएस यदियुरप्पा यांनी राज्यात ट्रेन, बस आणि टॅक्सीची सेवा आजपासून पुन्हा सुरु करण्यास परवानगी दिली आहे. कर्नाटक सरकारने लॉकडाऊन 4 ची घोषणा करून राज्यात लॉकडाऊन 4 मध्ये मोठी सूट देण्याची घोषणा केली आहे. सरकारने आज राज्यातील ट्रेन आणि बस सेवा सुरु करण्याची सूट दिली आहे. त्यामुळे राज्यांतर्गत चालणाऱ्या सर्व बसेस आणि ट्रेन सुरु करण्यास परवानगी मिळाली आहे. एवढेच नाही तर कर्नाटक सरकारने लॉकडाऊनमधील सर्व दुकाने उघडण्यास परवानगी दिली आहे.

राज्य सरकारने कोरोना व्हायरसचा फैलाव रोखण्यासाठी महाराष्ट्र, गुजरात, केरळ आणि तामिळनाडू या राज्यातील लोकांना 31 मे पर्यंत राज्यात येण्यास बंदी घातली आहे तर दुसरीकडे लॉकडाऊन 4 अंतर्गत राज्यामध्ये सर्वात मोठी सूट देण्याची घोषणा केली आहे. कर्नाटकात आतापर्यंत 1147 कोरोना बाधित रुग्ण आढळून आले आहेत. त्यापैकी 37 जणांचा मृत्यू झाला आहे. तर 509 लोकांनी कोरोनावर मात केली असून त्यांना घरी सोडण्यात आले आहे. कर्नाटक सरकारने राज्यातील दुकाने, ट्रेन, बस सेवा सुरु केली आहेच शिवाय राज्यातील सर्व उद्यानेही उघडण्याचे आदेश दिले आहेत.

राज्यात मोठी सूट देण्याची घोषणा करताना रेड झोन मध्ये फक्त अत्यावश्यक सेवांनाच परवानगी देण्यात आली आहे. एका अधिकाऱ्याने सांगितले की, ही सेवा 17 मे रोजी केंद्रीय गृह मंत्रालयाच्या निर्देशानुसार सोशल डिस्टन्सिंग आणि दिशानिर्देशांसह पुन्हा सुरु करण्यात आली आहे. जे लोक सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांचे उल्लंघन करतील त्यांच्याविरोधात कडक कारवाई करण्यात येणार आहे. दरम्यान, केंद्र सरकारने देशव्यापी लॉकडाऊन 31 मे पर्यंत वाढवण्यात येत असल्याची घोषणा केली.

सरकारने नव्या लॉकडाऊनसाठी दिशानिर्देश आणि नवीन नियमावली जारी केली आहे. यामध्ये कोणत्या गोष्टीवर प्रतिबंध ठेवायचा याचा निर्णय घेण्याचे अधिकार राज्य सरकारांना दिले आहेत. तसेच लॉकडाऊन 4 अंतर्गत प्रतिबंध हटवण्याचे अधिकार देखील राज्य सरकारांना देण्यात आले आहेत.