लॉकडाऊन 5.0 : देशात 8 जूनपासून उघडणार सलून-मॉल, नाईट कर्फ्यूमध्ये सुद्धा मिळाली सूट

नवी दिल्ली : चीनच्या वुहान शहरातून पसरलेल्या घातक कोरोना व्हायरसला तोंड देण्यासाठी मोदी सरकारने पुन्हा एकदा लॉकडाऊन वाढवले आहे. लॉकडाऊन 5.0 ची गाईडलाइन मोदी सरकारने जारी केली आहे. हा लॉकडाऊन 1 जून ते 30 जूनपर्यंत लागू राहील. यावेळी कंटेन्मेंट झोनच्या बाहेर सरकारद्वारे टप्प्याटप्प्याने सुट दिली आहे.

नव्या गाईड लाईननुसार भारतात लॉकडाऊन तीन फेजमध्ये उघडेल. मोदी सरकारने पहिल्या फेज अंतर्गत 8 जूनपासून धार्मिक स्थळ, हॉटेल, सलून, रेस्टॉरन्ट उघडण्याची परवानगी दिली आहे. मात्र, मोदी सरकारने अटींसह ही परवानगी दिली आहे.

याशिवाय नाईट कर्फ्यूमध्ये सूट दिली आहे. एक जूनपासून देशात रात्री 9 वाजल्यापाासून सकाळी 5 वाजेपर्यंत कर्फ्यू लागू राहील. आतापर्यंत कर्फ्यू सायंकाळी 7 ते सकाळी 7 पर्यंत होता. नव्या गाईड लाईनमध्ये म्हटले आहे की, लोक एका राज्यातून दुसर्‍या राज्यात जाऊ शकतात. लोकांना आता पास दाखवण्याची गरज नाही. तसेच एका जिल्ह्यातून दुसर्‍या जिल्ह्यात जाण्यासाठी सुद्धा परवानगीची गरज नाही. तर, शॉपिंग मॉल्ससुद्धा उघडण्याची परवानगी दिली आहे.

दुसर्‍या फेजअंतर्गत शाळा-कॉलेज उघडण्याचा निर्णय केंद्राने राज्यांवर सोडला आहे. यावर जुलैमध्ये राज्य सरकार निर्णय घेतील. लॉकडाऊन 5.0 दरम्यान देशभरात अंतरराष्ट्रीय उड्डाणे, मेट्रो रेल्वेचे संचालन, सिनेमा हॉल, जिम, स्विमिंग पूल, थिएटर, बार, ऑडिटोरियम आणि असेंब्ली हॉल आदीवर प्रतिबंध राहणार आहे. हे उघडण्याबाबत सरकार तिसर्‍या फेजमध्ये निर्णय घेऊ शकते.

मोदी सरकारने कोरोना व्हायरस पसरण्यावर रोख लावण्यासाठी 25 मार्चपासून देशव्यापी लॉकडाऊन सुरू केला होता. सध्या लॉकडाऊन 4.0 सुरू आहे. जो 31 मे रोजीपर्यंत चालेल. यानंतर लॉकडाऊन 5.0 सुरू होईल. तर, लॉकडाऊन सुरू असूनही कोरोना व्हायरसच्या रूग्णांमध्ये आणि मृत्यूंमध्ये सतत वाढ होत आहे.