मुंबई-पुण्यासह ‘या’ 11 शहरांवर ‘फोकस’, धार्मिक स्थळ-जिममध्ये सूट ? असा असू शकतो लॉकडाऊन 5.0

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊनचा पाचवा टप्पा सध्या तयार केला जात आहे. सूत्रांनुसार, पंतप्रधान नरेंद्र मोदी लवकरच लॉकडाऊन ५.० बद्दल मन की बात करू शकतात. लॉकडाऊनच्या पाचव्या टप्प्यात, कोरोनामुळे प्रभावित ११ शहरे वगळता देशाच्या उर्वरित भागात सवलत वाढवली जाऊ शकते.

लॉकडाऊनच्या पाचव्या टप्प्यात दिल्ली, मुंबई, बेंगळुरू, पुणे, ठाणे, इंदूर, चेन्नई, अहमदाबाद, जयपूर, सूरत आणि कोलकाता या ११ शहरांवर लक्ष केंद्रित केले जाईल, असे सूत्रांचे म्हणणे आहे. या शहरांमध्ये ७० टक्के पेक्षा जास्त कोरोनाची प्रकरणे आहेत. केवळ ५ शहरांमध्ये (अहमदाबाद, दिल्ली, पुणे, कोलकाता, मुंबई) ही संख्या ६० टक्क्यांच्या जवळ आहे.

लॉकडाऊनच्या पाचव्या टप्प्यात केंद्राकडून धार्मिक स्थळे उघडण्याची परवानगी दिली जाऊ शकते, परंतु नियम व अटी लागू असतील. धार्मिक ठिकाणी कोणताही उत्सव साजरा करण्यास सूट मिळणार नाही. तसेच मोठ्या संख्येने लोक एकत्र होणार नाहीत. मास्क घालणे आणि सोशल डिस्टंसिंग अनिवार्य असेल.

लॉकडाऊन ५.० दरम्यान कंटेनमेंट झोन वगळता सगळ्या झोनमध्ये सलून आणि जिम उघडण्याची परवानगी दिली जाऊ शकते. मात्र या टप्प्यात कोणत्याही शाळा, महाविद्यालय-विद्यापीठ उघडण्याची परवानगी दिली जाऊ शकत नाही. तसेच मॉल आणि मल्टिप्लेक्स देखील बंद ठेवले जाऊ शकतात.

सांगितले जात आहे की, लॉकडाउन ५.० मध्ये आणखी काही लोकांना लग्न आणि अंत्यसंस्कारात सहभागी होण्याची परवानगी दिली जाऊ शकते. लॉकडाऊनचा पाचवा टप्पा दोन आठवड्यांसाठी लागू केला जाऊ शकतो, असे सूत्रांचे म्हणणे आहे.