राज्यात लॉकडाऊन, मात्र 11 ‘या’ जिल्ह्यात होणार सर्वात एकदम कठोर अंमलबजावणी

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन –  राज्यात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता राज्य सरकारने 31 जुलैपर्यंत लॉकडाऊन वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. 31 जुलैपर्यंत टप्प्याटप्याने लॉकडाऊनमध्ये शिथिलता दिली जाणार आहे. मिशन बिगेन अगेन अंतर्गत दिलेल्या शिथिलताही सुरु राहतील. कोरोनाचे रुग्ण वाढत असल्यास संबंधित जिल्हाधिकारी किंवा पालिका आयुक्त अनावश्यक सेवांवर ठराविक भागात निर्बंध घालू शकतात.

MMR परिसरात केवळ अत्यावश्यक सेवेतील लोकांनाच तसंच कार्यालयात जाणाऱ्यांनाच दूरचा प्रवास करता येणार आहे. शॉपिंगसाठी जवळच्या मार्केटमध्ये जाता येणार आहे, परंतु दूर जाता येणार नाही.

कोणत्या भागात कडक लॉकडाऊन ?

लॉकडाऊनमध्ये शिथिलता आणण्यात आल्यानंतर महाराष्ट्रातील अनेक भागात कोरोनाचा वेगाने फैलाव सुरु झाला आहे. मुंबई पुण्यासारख्या मोठ्या शहरांपासून जिथं आतापर्यंत कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात झाला नव्हता अशा ग्रामीण भागातही कोरोनाने आता शिरकाव केला आहे. त्यामुळे अधिक कोरोना रुग्ण असलेल्या मुंबईसह एमएमआर परिसरात तसंच पुणे, सोलापूर, औरंगाबाद, मालेगाव, नाशिक, धुळे, जळगाव, अकोला अमरावती, नागपूर महापालिका परिसरात अधिक निर्बंध असणार आहेत.

देशातील स्थिती चिंताजनक

कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढू लागल्याने देशातील स्थिती चिंताजनक बनली आहे. दररोज कोरोनाचे रेकॉर्ड ब्रेक आकडेवारी समोर येत आहे. देशात कोरोनाची एकूण संख्या 5 लाख 48 हजार 318 वर पोहचली आहे. गेल्या 24 तासांमध्ये कोरोनाचे 19 हजार 459 नवीन रुग्ण आढळले आहेत आणि 380 जणांचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. सलग दुसऱ्या दिवशी कोरोनाची जवळपास 20 हजार प्रकरणं समोर आली आहेत.