Lockdown Again In Pune : पुणे, पिंपरी-चिंचवड, 3 कॅन्टोंन्मेंट परिसरासह हवेली आणि मुळशी तालुक्यातील 25 गावात मध्यरात्रीपासून कडक लॉकडाऊन

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनानं 14 जुलैच्या पहाटे 1 ते 23 जुलैच्या रात्री 12 वाजण्याच्या दरम्यान शहर आणि परिसरात कडक लॉकडाऊन जाहीर केला आहे. त्यामध्ये पुणे शहर, पिंपरी-चिंचवड, पुणे-खडकी आणि देहूरोड कॅन्टोंमेंट परिसरासह हवेली आणि मुळशी तालुक्यातील 25 गावांचा समावेश आहे.

पुणे आणि पिंपरी-चिंचवड महापालिकेनं लॉकडाऊनबाबत नियमावली जाहीर केली आहे. आता जिल्हाधिकार्‍यांनी लॉकडाऊनबाबत आदेश काढलेले आहे. पुणे शहर, पिंपरी-चिंचवड, पुणे-खडकी आणि देहूरोड कॅन्टोंमेंट परिसरात हवेली आणि मुळशी तालुक्यातील 25 गांवामध्ये कडेकोट लॉकडाऊन असणार आहे. हवेली तालुक्यातील वाघोली, केसनंद, आव्हाळवाडी, मांजरी बुद्रुक, कदमवाकवस्ती, लोणीकाळभोर, उरूळीकांचन, कुंजीरवाडी, औताडे, हांडेवाडी, वडकी, नांदेड, किरकिटवाडी, खडकवासला, गोर्‍हे बुद्रुक, गोर्‍हे खुर्द, डोणजे, खानापुर आणि थेऊर तर मुळशी तालुक्यातील नांदे, भुगाव, भुकुम, पिरंगुट, घोटावडे आणि हिंजवडी ग्रामपंचायतीच्या हद्दीत कडक लॉकडाऊन असणार आहे. याबाबत जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी सविस्तर आदेश जारी केले आहेत.