लॉकडाऊनमध्ये थेट ‘फेसबुकवर’ दारूच्या ‘जाहिराती, पिंपरी-चिंचवड पोलिसांनी केले ‘हे’ आवाहन

पिंपरी/पुणे : पोलीसनामा ऑनलाइन –  जगभरात कोरोना व्हायरसने धूमाकूळ घातला आहे. कोरोनाचे संकट दिवसेंदिवस वाढत असून भारतात देखील कोरोना व्हायरने थैमान घालण्यास सुरुवात केली आहे. या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने देशात 21 दिवसांचा लॉकडाऊन जाहीर केला आहे. मात्र, लॉकडाऊनचाही काही समाजकंटकांकडून गैरवापर करण्याचा प्रयत्न केला जात आहे. याबाबत पिंपरी चिंचवड पोलिसांनी ट्विट करून नागरिकांना जागृत केले आहे.

लॉकडाऊनच्या काळात अल्कहोलच्या विक्रीसंदर्भात फेसबुकवर जाहिराती प्रसिद्ध केल्या जात आहेत. या जाहिराती खोट्या आहेत. एखाद्या विशिष्ट बँक खात्यात पैसे हस्तांतरित करण्यास सांगितले जाते आणि पीडित व्यक्तीस नंतर ब्लॉक केले जाते. बँक तपशील किंवा आर्थिक व्यवहार सामायिक करू नका, असे आवाहन पिंपरी-चिंचवड पोलिसांनी केले आहे. ऑनलाईन दारू विक्रीच्या जाहीरातींतून फसवणूक झाल्याच्या सायबर आणि एक्साईज विभागाकडे अनेक तक्रारी आल्या आहेत.

लॉकडाऊन दरम्यान दारू विक्रत्यांवर छापे
लॉकडाऊन दरम्यान छुप्या पद्धतीने दारूची विक्री करण्यात येत आहे. पुणे जिल्ह्यात 16 लाखांची हातभट्टी दारू जप्त करण्यात आली आहे. भोर, दौंड, जुन्नर, नारायणपूर सारख्या भागात उत्पादन शुल्क विभागाने छापे टाकले आहेत. यामध्ये मोठ्या प्रमाणात हातभट्टीवर कारवाई करण्यात आली आहे.