Lockdown : ‘कोरोना’च्या संकटामुळे ट्रीमरनं केलं जातंय ‘टक्कल’ आणि बरंच काही , देशभरात ‘सलून’ आणि ‘पार्लर’ही बंद

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन टीम – अलीकडे हेअरस्टाइलचे नवनवे फंडे आले असून, तरुणाई त्याला बळी पडते आहे. मात्र, नव्या फंड्यांना कोरोना व्हायरसने मूठमाती दिली म्हटले तर वावगे ठरणार नाही. समाज आणि कार्यालयामध्ये नीटनेटकेपणाला महत्त्वाचे स्थान आहे. त्यामुळे दाढी, कटिंग करणे, केस रंगवणे याकडे प्रत्येकजण कटाक्षाने पाहतो. कोरोना व्हायरसचा संसर्ग रोखण्यासाठी देशभर लॉकडाऊन जाहीर केल्यामुळे सलून आणि पार्लरची दुकानेही पूर्णपणे बंद आहेत. त्यामुळे आता घरीच कटिंग करावी लागत आहेत. एरवी दाढी कोरण्यासाठी सर्वांत जास्त वापरले जाणारे ट्रिमर आता कटिंगसाठी वापरण्याचे प्रमाणही वाढले आहे. अत्यावश्यक सेवेच्या खरेदीसाठी मेडिकल, किराणा दुकान, येथे गेल्यानंतरही नागरिकांकडून ट्रिमरची मागणी होऊ लागली आहे.

कोरोनाचा व्हायरस रोखण्यासाठी देशभर ‘लॉकडाउन’मुळे नागरिकांना विविध अडचणींचा सामना करावा लागत आहे. त्यामधील मोठी अडचण कटिंग करण्याची झाली आहे. सध्या जीवनावश्यक सेवा वगळता इतर दुकाने बंद आहेत. त्यामुळे नियमित सलून दुकानामध्ये जाऊन हेअर कट करणाऱ्याना आता कटिंग करायची कशी, असा प्रश्न प्रकर्षाने जाणवू लागला आहे. ‘करोना’च्या भीतीमुळे सलूनमधील कारागिर घरी बोलावण्याची सोय नाही. त्यामुळे नाईलाजाने का होईना, मात्र, आता घरीच हेअर कट करण्याची वेळ नागरिकांवर येऊ लागली आहे. त्यातच अनेकजण हेअर कट करण्याचे काम सोयिस्कर व्हावे, कटिंग करताना दुखापत होऊ नये, यासाठी हेअर कट ट्रिमरला प्राधान्य देत आहेत. त्यामुळे मागिल पंधरा दिवसांपासून ट्रिमरची मागणीही वाढू लागली आहे.

शहर आणि ग्रामीण भागातील मेडिकल स्टोअर्स, किराणा दुकानामध्ये ग्राहकांकडून हेअर कटिंग ट्रिमरची मागणी होऊ लागली आहे. याबाबत ट्रिमरच्या कंपनीत सेल्स रिप्रेझेन्टिटिव्ह म्हणून काम करणारे मनोज कुलकर्णी म्हणाले की, ‘लॉकडाउनमुळे सध्या प्रत्येक डीलरकडे, दुकानात प्रत्यक्ष जाऊन ऑर्डर घेण्याचे काम बंद करण्यात आले आहे. मात्र, बहुतांश डीलर मोबाइलवर संपर्क साधून हेअर कटिंग ट्रिमरची मागणी वाढत असल्याचे सांगत आहेत. मेडिकल दुकानांसह, किराणा दुकानदारांकडून त्यांच्याकडे ट्रिमरची मागणी होऊ लागल्याचे चित्र समोर येत आहे.

कोरोनामुळे केले टक्कल

हिंदू संस्कृतीमध्ये आई-वडिलांचे निधन झाल्यानंतर टक्कल करण्याची पद्धती आहे. दुसरे म्हणजे तिरुपती बालाजीला डोक्यावरील केस दान करण्याची रूढ परंपरा आहे. त्यामुळे आतापर्यंत टक्कल केलेली व्यक्ती पाहिली की, काही दुःखद घटना की बालाजीला गेला होता, अशी विचारणा केली जात होती. मात्र, मागिल आठवड्यात अनेकांनी टक्कल केलेले पाहून चौकशी केली, तर त्यांनी सांगितले. आई-वडिल सुखरूप आहेत, बालाजी देवस्थान बंद आहे. त्यामुळे आता कोरोनाचे संकट टाळण्यासाठी म्हणून टक्कल केले आहे.

आता ट्रीमरचा वापर टक्कल करण्यासाठी

घरगुती ट्रिमरचा उपयोग दाढी कोरण्यासाठी अनेकांकडून करण्यात येतो. दाढी स्वतःला करता येत असली तरी कटिंग मात्र दुसऱ्याकडूनच करावी लागते. त्यामुळे हेअरस्टाइल व्यवस्थित करणे अनेकांना जमत नाही. त्यामुळे सोपा उपाय म्हणून सरळ टक्कलच केले जात आहे. त्यामुळे लहान मुलांच्या डोक्यावरील सर्वच केस कापून टाकले जात असल्याचे प्रकारही दिसू लागले आहेत.

हडपसरमधील बाळा रायकर म्हणाले की, ट्रिमरमध्ये घरगुती वापरासाठी व प्रोफेशनल वापरासाठी असे दोन प्रकार असतात. प्रोफेशन वापरासाठी असणाऱ्या ट्रिमरचा उपयोग करून न्यू स्टाइलीश हेअर कट केले जातात. घरगुती वापराचे ट्रिमरद्वारे ते शक्य होत नाही. तसेच, ते वापरण्यासाठी कुशल कारगीर नसतात. घरगुती वापराचे ट्रिमर वापरून टक्कल करणे मात्र शक्य आहे. सध्या नाईलाजाने तात्पुरता उपाय म्हणून घरगुती ट्रिमर वापरून टक्कल केले जात आहे.