Lockdown : डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांना अडवू नका…

पुणे : पोलिसनामा ऑनलाइन – खासगी डॉक्टर व रुग्णालयातील कर्मचाऱ्यांना नाकाबंदीत अडवून न ठेवता त्यांचे ओळखपत्र पहावे. तर कर्मचाऱ्यांना संबधित डॉक्टरांनी दिलेले पत्र ग्राह्य धरून त्याची शहानिशा करून सोडण्यात यावे अशा सूचना वाहतूक विभागाचे अपर पोलिस आयुक्त डॉ. संजय शिंदे यांनी दिल्या आहेत.

शहरात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अनेक डॉक्टरांनी गेल्या काही दिवसांपासून रुग्णालये बंद ठेवली आहेत. त्यामुळे  इतर आजाराने रुग्णांना त्रस्त असणाऱ्या रुग्णांना अडचणी येत आहेत. त्यामुळे पालिकेच्या रुग्णालयावर ताण येत आहे. खासगी रुग्णालये चालविणाऱ्या डॉक्टरांनी आपले दवाखाने सुरू ठेवावेत. तर काही डॉक्टरांनी पालिकेच्या रुग्णालयात येऊन कोरोना व्यतिरिक्त आजारांचे रुग्ण तपासावेत, असे आवाहन पालिका आयुक्त शेखर गायकवाड आणि पोलिस आयुक्त डॉ के व्यंकटेशम यांनी केले होते.

इंडियन मेडिकल असोसिएशनच्या (आय ए एम) डॉक्टरांनी दोन दिवसांपासून आपली रुग्णालये सुरू केली आहेत. तर काही पालिकेच्या रुग्णालयात सेवा करत आहेत. रुग्णालये सुरू झाल्याने येथे काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना देखील यावे लागते.

मात्र सध्या शहरात संचारबंदी सुरू असल्याने जागोजागी नाकाबंदी करण्यात आली आहे. त्यामुळे इच्छित ठिकाणी जाण्यासाठी डॉक्टर आणि त्यांच्या कर्मचाऱ्यांना त्रास सहन करावा लागतो. नाकाबंदी दरम्यान ओळखपत्र पाहून देखील अनेकदा डॉक्टर आणि त्यांच्या कर्मचाऱ्यांना सोडले जात नाही. धायरीत नाकाबंदीच्या ठिकाणी कार्यरत असलेल्या पोलिस कर्मचाऱ्याने डॉक्टरांनी त्यांच्या कर्मचाऱ्याला दिलेले पत्रच फाडून फेकून दिल्याचा प्रकार घडला. पोलिसांकडून सहकार्य मिळत नसल्याच्या काही तक्रारी थेट पोलिस आयुक्त यांच्याकडे करण्यात आल्या होत्या. यावर आवश्यक ती कार्यवाही करण्याचे पोलिस आयुक्तांनी सांगितले होते. त्यामुळे अपर पोलिस आयुक्त शिंदे यांनी याबाबतच्या सूचना सर्व पोलिस स्टेशनच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना दिल्या आहेत. नाकाबंदीच्या ठिकाणी कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांना याबाबत सूचना द्याव्यात, असे शिंदे यांनी दिलेल्या सूचनांमध्ये म्हटले आहे.