Lockdown : नशेत गाडी चालवत युवक बेडरूममध्ये घुसला अन्…

फरीदाबाद :  पोलीसनामा ऑनलाइन –   कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर देशात सुरु असलेल्या लॉकडाऊन दरम्यान सर्वत्र दारुची दुकाने बंद आहे. मात्र कोठेना कोठे तरी चोरून दारु विक्री केली जात आहे. यातून अपघात घडू लागल्याने हा प्रकार समोर येत आहे. असाच काही प्रकार फरीदाबादमध्ये घडला आहे. दारुच्या नशेत असलेल्या कार चालकाचे कारवरील नियंत्रण सुटलं आणि तो एका घराची भिंत तोडून बेडरूममध्ये जाऊन घुसला. या अपघातामध्ये कोणाचा मृत्यू झाला नसला तरी तो घरमालक प्रचंड दहशतीच्या छायेत आहे.

याबाबत पोलिसांनी सांगितले की, फरीदाबादमधील सेक्टर ८ मध्ये शुक्रवारी रात्री हा प्रकार घडला. घराचे मालक प्रेम दत्त कथुरिया हे त्यांच्या कुटुंबियांसोबत घरामध्ये झोपले होते. मध्यरात्रीच्या सुमारास गाढ झोपेत असताना त्यांना एक मोठा आवाज ऐकू आला. त्यावेळी डोळे उघडत नाहीत तोच एक कार बेडरूमची भिंत फोडून आतमध्ये घुसली, ही कार एवढी वेगात होती की कंपाऊंडमध्ये लावलेल्या बाईकचा चुराडा झाला होता. ही कार दीपांशु नावाचा व्यक्ती चालवत होता. मात्र या अपघातात कोणीही जखमी झालेलं नाही.

दरम्यान, घडलेल्या घटनेमुळे घर मालक कथुरिया यांचे कुटूंबीय खूप घाबरलेले होते की त्यांना रात्रीची झोप लागलीच नाही. त्यांना झालेली घटना सारखी डोळ्यासमोर येते असं त्यांनी म्हटलं. तसंच त्यांना प्रश्न पडला की, लॉकडाऊन सुरु असताना या तरुणाला दारु मिळालीच कशी. पोलिसांना अपघाताची सूचना मिळताच घटनस्थळावरून कार चालकाला ताब्यात घेतले आणि तो शुद्धीत आल्यावरती त्याची चौकशी करण्यात आली आहे.