Coronavirus : ‘कोरोना’ व्हायरसमुळे ब्रिटनमधील ‘लॉकडाऊन’ 3 आठवड्यांनी वाढविला

लंडन : वृत्तसंस्था – ब्रिटनमध्ये कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात झाला आहे. कोरोना व्हायरसचा फैलाव रोखण्यासाठी ब्रिटनमध्ये सुरु असलेला लॉकडाऊन आणखी तीन आठवड्यांनी वाढविण्यात आला आहे. दरम्यान, ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉनसन यांनी देशवासीयांना सतर्क राहण्याचे निर्देश दिले आहेत.

डोमिनिक रॅबने लॉकडाऊन वाढवल्याची घोषणा केली आहे. ते म्हणाले की गुरुवारी (दि.7) रात्री कोरोना व्हायरसच्या संसर्गाची गंभीर प्रकरणे आणि संसर्गाचा स्तर पाहता लॉकडाऊनमध्ये कोणताही बदल केलेला नाही. मात्र, आगामी काळात यामध्ये थोडी शिथिलता दिली जाऊ शकते असे आश्वासन त्यांनी देशवासीयांना दिले आहे.

एका वृत्तवाहिनीच्या वृत्तानुसार, ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉनसन हे येत्या रविवारी देशाला संबोधित करु शकतात. यावेळी ते काही प्रमाणात सूट जाहीर करू शकतात. यामध्ये सहलीसाठी जाणे किंवा व्यायामासाठी बाहेर जाणे यासारखी सूट असून शकते. परंतु लॉकडाऊन बऱ्याच गोष्टींमध्ये सुरुच राहणार आहे.

डॉमिनिक रॅब यांनी याबद्दल म्हटले आहे की, मी आज हे स्पष्ट केले आहे की नियमांमध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही. यानंतर पंतप्रधान रोडमॅपवर काम करतील. त्या रोडमॅपनुसार भाविष्यात काहीतरी करण्याचा विचार केला जाऊ शकतो. त्यांनी पुढे सांगितले की, कोरोना व्हायरस हा सध्या धोकादायक आणि आक्रमक झाला आहे. आम्ही त्याच्या संसर्गावर नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न करीत आहोत. मला खात्री आहे की आम्ही असे करण्यात यशस्वी होऊ.

दरम्यान, त्यांनी लॉकडाऊनमधील देण्यात येणाऱ्या सूट बद्दल बोलण्यास नकार दिला. या कालावधीत विषाणूचे पुनरुत्पादन दर 0.5 त 0.9 पर्य़ंत असल्याचे त्यांनी सांगितले. म्हणूनच असे सांगितले जात आहे की, हा विषाणू लोकांना मोठ्या प्रमाणात संक्रमित करत आहे.