Live Updates : राज्यात 14 दिवसांचा लॉकडाऊन? मुख्यमंत्री आणि टास्क फोर्सची बैठक सुरु, आजच होणार ‘फैसला’?

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – राज्यात कोरोना बाधित रुग्णांच्या संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. या पार्श्वभूमीवर शनिवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील सर्वपक्षीय बैठक बोलावली होती. या बैठकीत वाढत्या कोरोना संसर्गावर चर्चा करण्यात आली. यावेळी मुख्यमंत्र्यांनी राज्यात लॉकडाऊन करण्याचे संकेत दिले. याला विरोधी पक्षांनी देखील सहकार्य करण्याचे आश्वासन दिले. यानंतर आज मुख्यमंत्री आणि टास्क फोर्सची बैठक सुरु असून लॉकडाऊन संदर्भात आजच निर्णय होण्याची शक्यता आहे.

मुख्यमंत्री आणि टास्क फोर्सच्या बैठकीमध्ये राज्यात किती दिवसांचा लॉकडाऊन करावा, यावर चर्चा केली जाणार आहे. या बैठकीला राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, मुख्य सचिव सीताराम कुंटे, आरोग्य मंत्री राजेश टोपे यांच्यासह राज्यातील मोठमोठे डॉक्टर उपस्थित आहेत. या टास्क फोर्सच्या सदस्यांनी राज्यात 14 दिवसांचा लॉकडाऊन करण्याच्या बाजूने मत नोंदविले आहे.

शनिवारी सर्वपक्षीय बैठकीत सामान्यांच्या सोयीसाठी काय करता येईल यासंदर्भात नियमावली बनविण्यात येणार आहे. राज्यात आठ दिवसांच्या लॉकडाऊनचे संकेत मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत. दोन तास झालेल्या बैठकीमध्ये विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सामान्यांचा उद्रेक होणार नाही असा निर्णय घेण्याचा सल्ला दिला होता. तसेच सरकारच्या निर्णयाला आमचा पाठिंबा आहे. वेगवेगळ्या घटकांचा विचार व्हावा, लोकांसाठी काय प्लॅनिंग आहे हे तयार करावे लागेल असे फडणवीस यांनी सांगितले.

राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी उद्यापासून लगेच लॉकडाऊन लागू करता येणार नाही. काही दिवसांचा वेळ देऊन लॉकडाऊन केला जाईल, असे सांगितले आहे. यामुळे काही वेळात 8 दिवसांचा की 14 दिवसांचा लॉकडाऊन होणार यावर निर्णय होऊ शकतो. शिवसेना नेत्या निलम गोऱ्हे यांनी लॉकडाऊन करण्यापूर्वी तीन दिवस कामकाजी वेळ मागितली आहे, असे पत्र त्यांनी मुख्यमंत्र्यांना लिहले आहे.