Lockdown in Maharashtra : आढावा घेतल्यानंतर राज्यात लागू असलेले निर्बंध काही प्रमाणात शिथिल करण्याचे संकेत
मुंबईः पोलीसनामा ऑनलाइन – कोरोनाच्या तिस-या लाटेचा धोका आणि राज्यातील आरोग्य यंत्रणा अधिक सक्षम करण्याच्या उद्देशानेच राज्याच्या ग्रामीण भागातील डॉक्टरांशी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज रविवारी (दि. 16) दुपारी संवाद साधणार आहेत. कृति गटाचे सदस्यही यात सहभागी होणार आहेत. या संवादानंतरच आढावा घेऊन राज्यात सध्या लागू असलेले निर्बंध काही प्रमाणात शिथिल करण्याचे संकेत देण्यात येत आहेत. दरम्यान राज्यातील रुग्णसंख्या हळूहळू कमी होत असल्याने निर्बंध काही प्रमाणात शिथिल करावेत, अशी मागणी होत आहे. व्यापाऱ्यांनी काही वेळ तरी दुकाने उघडी ठेवण्यास परवानगी देण्याची मागणी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे. त्यानुसार वैद्यकीय क्षेत्रातील तज्ज्ञांशी विचारविनिमय करूनच हा निर्णय घेतला जाणार आहे.
यावेळी मुख्यमंत्री ग्रामीण भागातील वैद्यकीय चिकित्सकांशी संवाद साधणार आहेत. यावेळी प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये कोरोनावर उपचार या विषयावर राज्याच्या कोरोनाविषयक कृती गटाचे सदस्य डॉ. संजय ओक, डॉ. शशांक जोशी आणि डॉ. राहुल पंडित हे बोलणार आहेत. या ऑनलाइन कार्यक्रमात डॉक्टर्सनी सहभागी होऊन कोरोना लढाईला अधिक बळ देण्याचे आवाहनही केले आहे. हा कार्यक्रम OneMD च्या फेसबुक ww.facebook.com/rqquurqqysqvrxw/posts/tquqrtuzrryrsvz, आणि यूट्यूब चॅनेलवर https://youtu.be/xdHqXqFTC पाहता येणार आहे. तसेच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या समाजमाध्यमांवरूनही देखील त्याचे प्रसारण करण्यात येणार आहे.