अखेर महाराष्ट्रात Lockdown, लोकल सेवा आणि जिल्हाअंतर्गत वाहतूक बंद, पण…; वाचा नवीन नियमावली

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – महाराष्ट्रात कोरोना प्रकरणे विक्रमी संख्येत वाढू लागल्याने आरोग्य यंत्रणेवर प्रचंड ताण आला आहे. दररोज मोठ्या प्रमाणात नवे रूग्ण समोर येत असताना मृतांची संख्याही वाढू लागली आहे. या परिस्थितीचा विचार करून ठाकरे सरकारने संसर्ग तोडण्यासाठी पुन्हा ब्रेक द चेन अंतर्गत लॉकडाऊनचा निर्णय घेतला आहे. आज रात्री 8 वाजतापासून लॉकडाऊनची अंमलबजावणी होईल. या अंतर्गत राज्यातील जिल्हा अंतर्गत वाहतूक बंद होणार असून आवश्यक पास घेतल्यानंतरच ती करता येईल.

 

* हा लॉकडाऊन 1 मेपर्यंत लागू असेल. जिल्ह्याअंतर्गत बंद केल्याने खासगी ट्रॅव्हल्सने प्रवास आता करता येणार नाही.

* मुंबईत लोकल सेवा ही केवळ सरकारी कर्मचारी, डॉक्टर नर्सेस, अत्यावश्यक सेवा कर्मचारी यांना पास दाखवून करता येईल. सर्व सामान्यांना लोकलने प्रवास करता येणार नाही.

* विवाह सोहळ्यासाठी दोन तासांची मर्यादा घालण्यात आली आहे. केवळ 25 जण उपस्थितीत राहू शकतात. तर या नियमाचे उल्लंघन केल्यास 50 हजार रुपयांचा दंड आहे.

* अत्यावश्यक सेवा म्हणून कार्यालये सुरू राहणार आहेत. परंतु 50 टक्के कर्मचारीच काम करू शकतील. सर्व शासकीय कार्यालयात 15 टक्के उपस्थिती राहील.

* एका जिल्ह्यातून दूसर्‍या जिल्ह्यात जाण्यात बंदी असणार आहे. खासगी वाहतुकीला फक्त 50 टक्के प्रवाशांना घेऊनच प्रवास करता येईल. नियमांचे उल्लंघन केल्यास 10 हजार रुपये दंड भरावा लागेल.

मागील दोन दिवसांपासून कोरोना परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी मंत्रिमंडळाची बैठक होत आहे. राज्यात पुन्हा कडक लॉकडाऊन लावावा अशी मागणी मंत्र्यांनी केली होती. यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काल याबाबत निर्णय जाहीर केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाला संबोधित करत लॉकडाऊन हा शेवटचा पर्याय निवडा, असे म्हटले होते, परंतु राज्यात कोरोना व्हायरसची स्थिती वाढत चालल्याने 1 मेपर्यंत कडक लॉकडाऊनचा निर्णय घेण्यात आला आहे.