Lockdown in Maharashtra : चेन तुटण्यासाठी लॉकडाऊन अटळ; मुंबईचे पालकमंत्री अस्लम शेख

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत आहे. राज्य सरकार प्रादुर्भाव रोखण्यासाठी युध्दपातळीवर प्रयत्न करीत आहे. यापुर्वीच सरकारनं कडक निर्बंध घातले आहेत. तरी देखील प्रादुर्भाव वाढत असल्याने राज्य सरकार कडक लॉकडाऊन (कडक निर्बंध) करण्याचा विचार करत आहे. दरम्यान, मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी शनिवारी त्याच पार्श्वभुमीवर सर्वपक्षीय बैठक बोलावली होती तर आज (रविवार) मुख्यमंत्र्यांची टास्क फोर्ससोबत बैठक सुरू आहे.

मुंबईचे पालकमंत्री अस्लम शेख यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले की, सरकार अचानकपणे लॉकडाऊन लादत नाही. मात्र, चेन तुटण्यासाठी लॉकडाऊन अटळ आहे. कालच काँग्रेसचे नेते अशोकराव चव्हाण यांनी बैठकीदरम्यान लॉकडाऊन लावायचा असेल तर एक-दोन दिवस वेळ द्यावा असे सांगितले आहे असेही अस्लम शेख म्हणाले.

मुख्यमंत्र्याची टास्क फोर्ससोबत बैठक सुरू आहे. उध्दव ठाकरे हे टास्क फोर्समधील ज्येष्ठ डॉक्टरांशी चर्चा करीत आहेत. लॉकडाऊन हा 7 दिवसाची की 14 दिवसांचा असावा याबाबत देखील चर्चा करण्यात येत आहे. दरम्यान, राज्यात लॉकडाऊन होणार हे आता जवळपास निश्चित झाले आहे.