Lockdown in Maharashtra : राज्यात 31 मे पर्यंत लॉकडाऊन? लवकरच होणार निर्णय

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – कोरोनाच्या वाढत्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर राज्यात 15 मे पर्यंत लॉकडाऊन लागू करण्यात आला होता. मात्र अजूनही अपेक्षित अशी कोरोना रुग्णांची परिस्थिती आटोक्यात आली नाही. त्यामुळे लॉकडाऊनमध्ये वाढ होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.तिसऱ्या लाटेच्या अनुषंगाने आरोग्य यंत्रणा मजबूत करण्यासाठी राज्य सरकार 31 मे पर्यंत लॉकडाउन कायम ठेऊ शकते. यासंदर्भात कॅबिनेट बैठकीत निर्णय होण्याची शक्यता आहे. यापूर्वी ठाकरे सरकारकडून ३० एप्रिलपर्यंत लॉकडाउन जाहीर करण्यात आला होता, मात्र नंतर हा लॉकडाउन १५ मे पर्यंत वाढवला होता. दरम्यान, राज्यातील नाशिक, सातारा, सोलापूर, सिंधुदूर्ग, अमरावती, अकोला, यवतमाळ, वर्धा, वाशिम, बुलढाणा या ११ जिल्ह्यांमध्ये सध्या लॉकडाउन जाहीर करण्यात आला आहे. तर अनेक जिल्हे संपूर्ण लॉकडाउनची तयारी करत आहे.

मुंबईचे पालकमंत्री अस्लम शेख यांनी एका वृत्तवाहिनीशी बोलताना लॉकडाऊनचा फायदा झाल्याची माहिती दिली. लॉकडाऊनमुळे मुंबई आणि महाराष्ट्रातील रुग्ण संख्या नियंत्रणात येत आहे. आता तिसरया लाटेशी सामना करायचा आहे त्यामुळे आरोग्याच्या पायाभूत सुविधा उभारण्यासंबंधी प्रक्रिया सुरु झाली आहे. जम्बो सुविधा उभारण्यासाठी टेंडर प्रक्रिया सुरु झाली आहे, कामं सुरु झाली आहेत. लॉकडाउन पुढे वाढवायचा असेल तर त्यात कोणते निर्बंध उठवू शकतो, कोणत्या गोष्टींना परवानगी देऊ शकतो, कोणते निर्बंध कडक करायचे याचा विचार करावा लागेल. या संदर्भात सर्वांची मते घेण्यात येत आहेत. त्याचबरोबर टास्क फोर्स काय शिफारस करतं यासंबंधी कॅबिनेटमध्ये चर्चा करुन योग्य निर्णय घेतला जाईल, असेही अस्लम शेख यांनी सांगत महाराष्ट्रात आता रेमडेसिवीरसाठी पहिल्यासारखी मारामारी नाही असेही त्यांनी स्पष्ट केले.