Lockdown in Maharashtra : 31 मे नंतर लॉकडाऊन वाढणार? मुख्यमंत्री उध्दव ठाकरेंनी एकाच वाक्यात दिले स्पष्ट संकेत, म्हणाले…

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – मागील काही महिन्यांपासून राज्यात कोरोना रुग्णांची संख्या वेगाने वाढली. मात्र, आता कोरोना बाधित रुग्णांची संख्या कमी होत आहे. एप्रिल महिन्यात राज्यात दैनंदिन रुग्णसंख्या 70 हजारांच्या वर गेली होती. मात्र, आता हाच आकडा 30 हजारांच्या आत आला आहे. त्यामुळे राज्यातील आरोग्य यंत्रणेवरील ताण कमी झाला आहे. त्यामुळे सध्या राज्यात सुरु असलेले लॉकडाऊन 31 मे नंतर पुढे सुरु राहणार की यामध्ये शिथिलता आणली जाणार याकडे राज्यातील जनतेचे लक्ष लागले आहे. या संदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज (रविवार) महत्त्वाचे संकेत दिले आहे. लहान मुलांसाठी स्थापन केलेल्या टास्क फोर्समधील तज्ज्ञ डॉक्टरांशी संवाद साधताना मुख्यमंत्र्यांनी एका वक्यात लॉकडाऊन बाबत सूचक विधान केले आहे.

मुंबई, ठाणे, पुणे, नाशिक, नागपूर या मोठ्या शहरांमध्ये कोरोना बाधित रुग्णांची संख्या गेल्या काही दिवसांपासून घटली आहे. कोरोना रुग्ण वाढीच्या दरामध्ये लक्षणीय घट झाली आहे. त्यामुळे या शहरांना मोठा दिलासा मिळाला आहे. परंतु ग्रामीण भागामध्ये रुग्णांची संख्या वाढत असल्याने राज्यातील लॉकडाऊन पुढे सुरु राहणार की रद्द होणार असा प्रश्न सर्वांनाच पडला आहे. तज्ज्ञ डॉक्टरांशी संवाद साधताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी लॉकडाऊन बाबत बोलताना, ‘कटूपणा घेण्याची माझी तयारी आहे’, असे सूचक विधान केले आहे.

पालकांनी काळजी करु नये, सरकार समर्थ

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेनंतर पुढील काही महिन्यांमध्ये देशात कोरोनाची तिसरी लाट येईल आणि त्याचा सर्वाधिक धोका लहान मुलांना असेल, असा इशारा तज्ज्ञांनी दिला आहे. त्यामुळे ठाकरे सरकारनं बालरोग तज्ज्ञांच्या टास्क फोर्सची स्थापना केली आहे. या टास्क फोर्स मधील डॉक्टरांशी त्यांनी आज संवाद साधला. लहान मुलांच्या पालकांनी काळजी करु नये, लहान मुलांची काळजी घेण्यास सरकार समर्थ आहे. त्यादृष्टीने प्रशासनाची तयारी सुरु आहे. पालकांनी मुलांवर घरीच डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय कोणतंही औषध देऊ नये. त्यांच्यावर अनावश्यक भडिमार करु नये, असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी यावेळी केले.

अहोरात्र लसीकरण मोहिम राबवणार

लसींचा साठा कमी असल्याने सध्या नाईलाजास्तव 18 ते 44 वयोगटातील नागरिकांचे लसीकरण थांबवण्याचा निर्णय घेतला आहे. लसींची निर्मिती करणाऱ्या कंपनीची क्षमता जूनपासून वाढेल. त्यानंतर लीसींचा साठा उपलब्ध होईल अशी आशा आहे. 12 कोटी डोस एकरकमी खरेदी करण्याची सरकारची तयारी आहे. प्रत्येकाचे लसीकरण करण्यात येईल. कोणीही वंचित राहणार नाही. कोरोना लसींचा मुबलक साठा उपलब्ध झाल्यानंतर अहोरात्र लसीकरण मोहिम राबवण्यात येईल. 24 तास लसीकरण मोहिम सुरु राहील, अशी महत्त्वाची माहिती त्यांनी यावेळी दिली.

 

https://fb.watch/5FLTV8w2IP/