Lockdown in Maharashtra : 1 जूननंतर राज्यातील लॉकडाऊन वाढणार का? आरोग्यमंत्री राजेश टोपेंनी स्पष्ट सांगितलं…

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – कोरोनाने राज्यात थैमान घातले होते. मात्र गेल्या काही दिवसांपासून राज्यातील कोरोना रुग्ण वाढीचा वेग कमी झाला आहे. गेल्या महिन्यात राज्यात दररोज 70 हजारांहून अधिक रुग्ण आढळत होते. आता हाच आकडा 30 हजाराच्या खाली आला आहे. त्यामुळे आरोग्य यंत्रणेवरील ताण कमी झाला आहे. त्यामुळे 31 मे नंतर लॉकडाऊन संपणार का, असा प्रश्न राज्यातील जनतेला पडला आहे. आरोग्यमंत्री डॉ. राजेश टोपे यांनी याबद्दल महत्वाची माहिती दिली आहे. 1 जूनपासून निर्बंध टप्प्याटप्प्याने शिथिल केले जातील. कोरोना रुग्णांची संख्या नियंत्रणात असलेल्या जिल्ह्यांमधील निर्बंध हळूहळू मागे घेतले जाणार असल्याचे टोपे म्हणाले.

सध्या राज्यातील मुंबई, ठाणे, पुणे, नागपूर, नाशिक आदी शहरातील कोरोना रुग्णसंख्या घटली आहे. त्यामुळे या शहरांना मोठा दिलासा मिळाला आहे. मात्र ग्रामीण भागांत अद्यापही कोरोनाचा प्रादुर्भाव सुरु आहे. सध्या राज्यात कठोर निर्बंध आहेत. दुकानं केवळ सकाळी 7 ते 11 या वेळेत सुरु ठेवण्याची परवानगी दिली आहे. याचा परिणाम अनेक ठिकाणी दिसून आला आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव आटोक्यात आला आहे. मुंबईसह एमएमआर रिजनमधील स्थिती नियंत्रणात आहे. नाशिक, नागपूरमधील परिस्थितीदेखील आटोक्यात आली आहे. त्यामुळे या भागातील निर्बंध 1 जूनपासून हळूहळू शिथिल केले जातील. निर्बंध एकदम मागे घेण्याऐवजी टप्प्याटप्याे मागे घेतले जातील. कोरोना रुग्णसंख्या कमी झालेल्या जिल्ह्यांसाठी या प्रकारचे निर्णय घेतले जाणार असल्याचे टोपे म्हणाले.