Lockdown in Pune : पुणेकरांनो, महापालिकेचे निर्बंध आणखी कडक, नवीन नियमावली जाहीर

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – कोरोनाची साखळी तोडण्यासाठी ठाकरे सरकारने राज्यात संचारबंदीसह इतर निर्बंध बुधवारी आणखी कठोर केले आहेत. या पार्श्वभूमीवर पुणे महापालिकेने देखील नवीन नियमावली जाहीर केली आहे. या नियमांची कडक अंमलबजावणी आज गुरुवारी (दि. 22) रात्री आठ वाजल्यापासून सुरु झाली आहे. याबाबतचा आदेश महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी काढला आहे. या आदेशानुसार महापालिका क्षेत्रातील सर्व प्रकारची कार्यालयीन उपस्थिती, लग्न समारंभ, सार्वजनिक वाहतूक प्रवास याबाबत नियमावली जाहीर केली आहे. एका जिल्ह्यातून दुसऱ्या जिल्ह्यात प्रवास करणाऱ्या लोकांना विनापरवाना प्रवास करता येणार नाही, असेही या आदेशात नमूद केले आहे.

प्रवाशांच्या हातावर क्वारंटाइनचा शिक्का अन् अँटिजन टेस्टही
पुणे शहरात रेल्वे आणि एसटी महामंडळाच्या बसमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या हातावर 14 दिवसांच्या होम क्वारंटाइनचा शिक्का मारला जाईल. शिवाय त्यांची अँटिजन तपासणी देखील होईल. तसेच पालिका क्षेत्रातील पीएमपीएल वाहतूक व्यवस्था अत्यावश्यक सेवेसाठीच आसन क्षमतेच्या 50 टक्के सुरू राहणार आहे. महापालिका क्षेत्रात रेल्वे अथवा बसने प्रवास करणाऱ्या प्रवाशांची माहिती आपत्ती व्यवस्थापन विभागास द्यावी.

सरकारी,खासगी कार्यालयात 15 टक्के कर्मचा-यांची उपस्थिती
केंद्र सरकार, राज्य सरकार, स्थानिक स्वराज्य संस्था, स्थानिक प्राधिकरण, सहकारी, खासगी बँका, अत्यावश्यक सेवा पुरवणारी कार्यालये, फार्मास्युटिकल कंपन्यांची कार्यालये, रिझर्व बँक ऑफ इंडिया व त्यांच्या संलग्न वित्तीय संस्था, नॉन बँकिंग फायनान्शिअल इन्स्टिट्यूट, लघु कर्ज देणाऱ्या संस्था, वकील अशा सर्व कार्यालयांत कर्मचाऱ्यांच्या 15 टक्के किंवा 5 कर्मचारी यांच्यापैकी जी संख्या जास्त असेल त्या प्रमाणात बोलवावे. राज्यातील सर्व शासकीय कार्यालयांना या कालावधीत स्थानिक आपत्कालीन व्यवस्थापन प्राधिकरणाच्या प्रमुखांची परवानगी घ्यावी लागेल, असे आदेशात नमूद केले आहे.

विवाह सोहळयासाठी फक्त 2 तासाचा वेळ
विवाहसोहळ्यासाठी फक्त 2 तासांचा वेळ दिल आहे. तसेच लग्नसोहळ्याला 25 लोकांना उपस्थित राहण्याची परवानगी दिली आहे. एकाच हॉलमध्ये एकाच वेळी लग्न पूर्ण करावे लागेल. विविध हॉलमध्ये, वेगवेगळ्या वेळी, एकाच लग्नासाठीचे विधी करता येणार नाहीत. असे करताना आढळल्यास 50 हजाराचा दंड ठोठावला जाणार आहे.

अत्यावश्यक सेवा
हॉस्पिटल, रोग निदान केंद्र, लसीकरण केंद्र, वैद्यकीय विमा कार्यालय, औषधांची दुकाने अशा 29 अत्यावश्यक सेवा 50 टक्के क्षमतेने चालवण्यात याव्यात आणि गरज असेल तर ती क्षमता100 टक्क्यांपर्यंत वाढवता येईल.

प्रवासी वाहतूक 50 टक्के क्षमतेने सुरु राहील
बसेस वगळता इतर सर्व प्रवासी वाहतूक चालक वगळता 50 टक्के क्षमतेने चालवता येईल, पण ही वाहतूक एका शहरातून दुसऱ्या शहरात अथवा एका जिल्ह्यातून दुसऱ्या जिल्ह्यात करता येणार नाही. अशी वाहतूक फक्त अत्यावश्यक सेवा, वैद्यकीय सेवा, अंत्यसंस्कार किंवा कुटुंबातील अतिआजारी व्यक्तींना भेटण्यासाठी होईल, हा नियम तोडणाऱ्यांना 10 हजार रुपये दंड आकारला जाईल.

खासगी प्रवासी बसेससाठी अटी
स्थानिक आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या परवानगीने एका शहरात दोनपेक्षा जास्त थांबे घेता येणार नाहीत. हे थांबे प्राधिकरणाकडून मान्य करून घ्यावे लागतील. त्यांनी जर थांबे बदलायला सांगितले तर ते बदलावे लागेल. बसमधून उतरल्यावर बस ऑपरेटरने प्रवाशांच्या हातावर 14 दिवसाचा क्वारंटाइनचा शिक्का मारावा. तसेच प्रवाशांची थर्मल स्पॅनरद्वारे तपासणी करावी. जर यात कोणी आजारी आढळले तर त्यांना कोरोना केंद्रात दाखल केले जाईल. बसमधून येणाऱ्या प्रवाशांची अँटिजन तपासणी करावी, असे स्थानिक प्रशासनाला वाटले, तर प्रशासन सांगेल त्या ठिकाणी ती बस घेऊन जावे लागेल. तपासणीचा खर्च बसचालकाकडून किंवा प्रवाशांकडून वसूल केला जाईल. या नियमाचे उल्लंघन केल्यास 10 हजारांचा दंड ठोठावला जाणार आहे. परत नियम मोडल्यास कोरोना संपेपर्यंत लायसन्स जप्त केले असे आदेशात नमूद केले आहे.