Lockdown in Pune : पुणेकरांनो सकाळी 11 च्या आत घरात ! सोमवारी दुपारपासून Lockdown एकदम ‘कडक’

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन –  कोरोनाचे नवे पॉझिटिव्ह रुग्ण आता देखील मोठ्या प्रमाणात आढळून येत आहेत. ते कमी व्हावेत म्हणून पुण्यात कडक लॉकडाऊन करण्याचा गांभीर्याने विचार करावा, अशी सूचना उच्च न्यायालयाने नुकतीच राज्य शासनाला केली होती. त्यामुळे शहरातील कोरोना रुग्णांची संख्या (त्या वेळची आकडेवारी) चर्चेत आली आहे. संपूर्ण लॉकडाऊन करण्याची वेळ येण्यापूर्वीच खबरदारी घ्यावी, या हेतूने पुणे पोलीस शहरात कडक लॉकडाऊनची अंमलबजावणी करणार आहेत. त्यामुळे लोकांनी महत्वाची कामे सकाळी 11 वाजण्याच्या आतच पूर्ण करावीत. त्यानंतर दुपारी 12 वाजल्यापासून लॉकडाऊनची आणखी कडक अंमलबजावणी केली जाणार असल्याचे पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी आज सांगितले आहे.

पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता, सह पोलीस आयुक्त डॉ. रवींद्र शिसवे आणि इतर वरिष्ठ अधिकारी दररोज शहरातील विविध भागाला भेटी देऊन नाकाबंदीची पाहणी करत आहेत. उत्तमनगर, स्वारगेटसह शहरातील काही पोलीस ठाण्याच्या हद्दीत फिरुन पोलीस आयुक्त गुप्ता यांनी पाहणी केली. यावेळी काही ठिकाणी बंदोबस्तात काही उणिवा दिसून आल्या. त्याबाबत त्यांनी सूचना केल्या आहेत. सकाळी 11 वाजेपर्यंत अत्यावश्यक वस्तूंच्या खरेदीसाठी नागरिकांना सूट दिली आहे. सकाळी नागरिक विविध कारणे सांगत असतात. यातून रस्त्यावर पोलीस आणि नागरिक यांच्यात काही वेळा वादाचे प्रसंगही उद्भवतात. दरम्यान, नागरिकांनी आवश्यकता असेल तरच घरातून बाहेर पडावे. दुपारी 12 वाजल्यापासून रस्त्यावर येणार्‍या प्रत्येक वाहनाची तपासणी केली जाणार आहे. त्यामुळे नागरिकांनी घरात राहून पोलिसांना सहकार्य करावे असे आवाहन पोलीस आयुक्त गुप्ता यांनी केेले आहे. शहरात मोठया प्रमाणात नाकाबंदी करण्यात आली आहे.