Lockdown in Pune : पुणेकरांना कोरोनाच्या परिस्थितीचं गांभीर्य नाही? दररोज 4 हजार पुणेकर विनाकारण रस्त्यावर फिरतात; पोलिसांकडून जोरदार कारवाईला सुरूवात

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – कडक निर्बंध असतानाही रस्त्यावर विनाकारण फिरणाऱ्यांची संख्या कमी होत नसून, बेफिकीरीने पुणेकर फिरत असल्याचे दिसत आहे. पण, आता पोलिसांनी या विनाकारण फिरणाऱ्या नागरिकांवर जोरदार कारवाई सुरू केली आहे. गेल्या काही दिवसाला 4 हजार नागरिकांवर कारवाई केली जात आहे. शहरात कोरोनामुळे लॉकडाऊन लागल्यापासून आतापर्यंत एकूण 3 लाख 55 हजार जणांवर कारवाई केली आहे.

राज्यासह शहरात कोरोनाचा संसर्ग मोठ्या प्रमाणात वाढला आहे. या पार्श्वभूमीवर राज्यात संचारबंदी लागू करण्यात आली आहे. विनाकारण बाहेर फिरण्यास मनाई आहे. पण, तरीही शहरात नागरिक विनाकर बाहेर पडत असल्याचे दिसून येत आहे. यासाठी विविध ठिकाणी नाकाबंदी केली आहे. पोलीस तपासणी करून तसेच का बाहेर पडलात यासाठी विचारपूस करतात. त्यात विनाकारण फिरणाऱ्यावर कारवाई केली जात आहे.
त्यानंतरही विनाकारण बाहेर पडत असल्याचे दिसत आहे. नागरिकांचे बहाणेबाजी ऐकून पोलीसही चक्राहून गेले आहेत. मात्र आता पोलिसांनी कडक पाऊल उचलले आहे. या विनाकारण फिरणाऱ्यावर जोरदार कारवाई सुरू केली आहे. दिवसभर शहरात नाकाबंदी करून पोलीस विनाकारण फिरणाऱ्यावर कारवाई करत आहेत. गेल्या काही दिवसापासून पोलिसांनी कारवाईला जोर धरला आहे. दिवसाला 4 हजार नागरिकांवर कारवाई होत आहे. तर नागरिक देखील किती काळजीने या काळात राहत आहेत, असेही दिसत आहे. दरम्यान नुकतेच न्यायालयाने पुण्यात कडक लॉकडाऊनबाबत राज्य सरकारला सूचना केली. यानंतर प्रशासनाने कडक पावले उचलली आहेत.

आजपर्यंत साडे तीन लाख केसेस…
शहरात कोरोनाचे लॉकडाऊन झाल्यानंतर पोलिसांनी एकूण 3 लाख 54 हजार 969 केसेस केल्या आहेत. सर्वाधिक केसेस गेल्या लॉकडाऊनला झाल्या आहेत. तर यंदाच्या एप्रिल महिन्यात एकूण 30 हजार 300 केसेस करण्यात आल्या आहेत. एप्रिल महिन्यात सरासरी दिवसाला 1 हजार केसेस करण्यात येत होत्या. गेल्या काही दिवसात हा आकडा 4 हजारांवर गेला आहे. त्यामुळे पोलिसांनी विनाकारण बाहेर पडू नये असे आवाहन केले आहे.