Coronavirus Lockdown : ‘या’ राज्याने 29 मेपर्यंत वाढवला लॉकडाऊन

हैदराबाद : वृत्तसंस्था – देशात तिसऱ्या टप्प्यातला लॉकडाऊन संपायला आता काही दिवस राहिलेले असतानाच तेलंगणाने चौथ्या लॉकडाऊनची घोषणा केली आहे. राज्यातल्या लॉकडाऊन 29 मेपर्यंत वाढविण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. कोरोना रुग्णांच्या संख्येत दररोज वाढ होत असल्याने राज्य सरकारने हा निर्णय घेतला आहे. तेलंगणात आज 11 नवीन रुग्ण सापडले असून राज्यातील कोरोना रुग्णांची संख्या 1096 वर गेली आहे. चौथे लॉकाडाऊन वाढविणारं तेलंगणा हे पहिलच राज्य आहे.


कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत असल्याने सर्वांची चिंता वाढली आहे. लॉकडाऊन संपायचे दिवस आणि रुग्णांची संख्या वाढायची वेळ एकच होत आहे. तर टेस्टिंग वाढविल्यामुळे रुग्णसंख्या वाढत असल्याचं स्पष्टीकरण आरोग्य मंत्रालयाने दिलं आहे. देशात गेल्या 24 तासात 3900 नवे रुग्ण आढळून आलेत. त्यामुळे कोरोना रुग्णांची एकूण संख्या वाढून 46433 झाली आहे. त्यात 32138 अ‍ॅक्टिव्ह रुग्ण आहेत. तर 24 तासात 195 जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे देशातील मृतांचा आकडा 1568 वर गेला आहे.


देशामध्ये महाराष्ट्रात कोरोना बाधित रुग्णांची संख्या सर्वाधिक असून राज्यातील कोरोनाच्या रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस भर पडत आहे. त्यामुळे राज्याची चिंता गंभीर होत चालली आहे. राज्यात मागील 24 तासात 841 नवी कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत. तर राज्यात 34 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांची संख्या 617 झाली आहे.