काय सांगता ! होय, बकरी विकून ‘त्यानं’ खरेदी केलं विमानाचं तिकीट, फ्लाईट अचानक ‘कॅन्सल’

मुंबई : पोलिसनामा ऑनलाइन – देशात कोरोना संसर्गाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी गेल्या २ महिन्यांपासून लॉकडाऊन सुरु आहे. या काळात स्थलांतरित मजूर आपल्या घरापासून दूर अन्य राज्यात अडकून पडले आहेत. केंद्र सरकारने लॉकडाऊनच्या चौथ्या टप्प्यात काही प्रमाणात शिथिलता दिली. त्यानंतर सोमवार पासून देशांतर्गत विमान सेवा सुरु करण्यात आली. पण अनेक राज्यांनी घातलेल्या विविध अटींमुळे काही ठिकाणी फ्लाईट्स रद्द झाल्या. त्यामुळे प्रवाशांच्या अडचणीत भर पडली आहे.

अशीच एक घटना मुंबईत घडली आहे. येथील एक प्रवाशी अडचणीत सापडला असून, त्याला मुंबईतून कोलकाता येथे जायचं होत. कोरोना संसर्गामुळे करण्यात आलेल्या लॉकडाऊन नंतर मजुराच्या उत्पन्नाचं साधन बंद पडलं आहे. घरी जाण्यासाठी साधन नसल्यामुळे या मजुराने बचत केलेल्या पैशातून विमानाचं तिकीट खरेदी करण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी त्याला आपल्या जवळच्या बकऱ्याही विकायला लागल्या. एकूण ३० हजार ६०० रुपये जमा करून मजुराने इंडिगोचं तिकीट खरेदी केलं.

यासाठी २८ मे रोजी फ्लाईट होती, पण काही कारणास्तव इंडिगोची ही फ्लाईट रद्द झाली. यामुळे मजुराच्या पदरी घोर निराशा पडली. हा मजूर मुंबईतच अडकला असल्याने हे प्रकरण मीडियासमोर आलं. तेव्हा विमान कंपनीने या मजुराला १ जूनच्या फ्लाईटमधून मुंबईहून कोलकाताला पाठवण्याची व्यवस्था केली. तसंच यासाठी कोणत्याही प्रकारचं अतिरिक्त शुक्ल आकारलं जाणार नसल्याचं त्यांनी जाहीर केलं.

दरम्यान, देशांतर्गत विमान सेवा सुरु झाल्यानंतर विमान प्रवास करणाऱ्या प्रवाशांना कोरोना संसर्गाची लागण झाल्याचं समोर आलं आहे. यामुळे विमानतळांवरील यंत्रणेवर प्रश्न चिन्ह उपस्थित झाले आहेत. सरकारने विमान कंपन्या सुरु करण्यास कोणत्याही प्रकारची घाई केली नाही ना अशी शंका व्यक्त होत आहे. मंगळवारी एअर इंडियाच्या विमानात नवी दिल्लीहून लुधियानाला जाणाऱ्या एका प्रवाशात कोरोना संसर्गाची लक्षण दिसली. त्यानंतर एअर इंडियाने एक पत्रक जाहीर करत उड्डाणातील सर्व प्रवाशांना क्वारंटाईन करण्यात येणार असल्याचं सांगितलं.