Lockdown in Maharashtra : लॉकडाऊनचा निर्णय उद्यावर ! CM ठाकरे आणि उपमुख्यमंत्री पवारांमध्ये सोमवारी सकाळी बैठक

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत आहे. राज्य सरकार कोरोनाची साखळी तुटण्यासाठी युध्दपातळीवर प्रयत्न करीत आहे. कडक निर्बंधानंतर देखील नव्या पॉझिटिव्ह रूग्णांची संख्या वाढत असल्याने राज्यात लॉकडाऊन शिवाय पर्याय नाही. मात्र, लॉकडाऊन किती दिवसांचा करायचा यासाठी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांची आज (रविवार) कोरोना टास्क फोर्ससोबत बैठक झाली. टास्क फोर्समधील ज्येष्ठ सदस्यांनी किमान 2 आठवडयाचा लॉकडाऊन करण्याचा सल्ला दिला आहे. आता याबाबत अंतिम निर्णय राज्य सरकार घेणार आहे. त्यासाठी सोमवारी (उद्या) सकाळी 11 वाजण्याच्या सुमारास टास्क फोर्समधील सदस्यांसोबत मुख्यमंत्री ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांची बैठक होणार आहे. त्यानंतर राज्यातील लॉकडाऊनबाबत निर्णय घेण्यात येणार असल्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी स्पष्ट केले आहे. दरम्यान, राज्यात लॉकडाऊन लागणार हे जवळपास निश्चितच मानले जात आहे. केवळ लॉकडाऊन कधीपासून आणि किती दिवसांचा याबाबत निर्णय होणे बाकी असल्याचे सांगितले जात आहे. राज्य सरकार लॉकडाऊन हा शब्द न वापरता त्याला कडक निर्बंध असे संबोधित करू शकते असंही सांगितलं जात आहे.

कोरोनाची साखळी तोडण्यासाठी लॉकडाऊन किमान 2 आठवड्यांचा म्हणजेच 14 दिवसांचा असावा असे मत टास्क फोर्समधील काही ज्येष्ठ सदस्य आणि तज्ज्ञांनी केले आहे तर आरोग्य मंत्री राजेश टोपे यांचे देखील तेच मत आहे. दरम्यान, मुख्यमंत्री ठाकरे आणि उपमुख्यमंत्री पवार यांच्यामध्ये उद्या सकाळी 11 वाजण्याच्या सुमारास बैठक होईल आणि त्यानंतरच अंतिम निर्णय घेतला जाईल असे सांगण्यात येत असले तरी लॉकडाऊन करण्यापुर्वी किमान 2 दिवस सांगितले जाईल असे वक्तव्य उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले होते. शिवसेनेच्या नेत्या डॉ. नीलम गोर्‍हे यांनी देखील लॉकडाऊन केलाच तर जनतेला किमान 3 दिवस द्यावेत असे पत्र मुख्यमंत्र्यांना पाठविले आहे. डॉ. गोर्‍हे यांनी इतर मागण्या देखील पत्राव्दारे केल्या आहेत. सद्यस्थितीत तर लॉकडाऊनबाबतचा निर्णय उद्यावर गेल्याचे चित्र आहे.