Coronavirus Lockdown : लॉकडाऊनमुळं ‘त्यांनी’ वडिलांचा मृतदेह चक्क बाईकवरून नेला

पालघर : पोलीसनामा ऑनलाइन – देशात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढत आहे. राज्यात देखील कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सरकारने देशामध्ये 21 दिवसांचा लॉकडाऊन जाहीर केला आहे. त्यामुळे राज्यात लॉकडाऊन सुरु असल्याने रस्त्यावरील वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे. त्यामुळे राज्यातील जनतेची ससेहोलपट होत आहे. पालघरमध्ये तर दोन मुलांना आपल्या वडीलांचा मृतदेह चक्क दुचाकीवरून न्यावा लागल्याची धक्कादायक घटना घडली आहे.

ही घटना पालघर जिल्ह्यातील चिंचारे येथे घडली आहे. चिंचारे येथील लडका वावरे यांना काही दिवसांपूर्वी सर्पदंश झाला होता. त्यामुळे त्यांना उपचारासाठी कासा येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल कण्यात आले होते. वावरे यांच्यावर उपचार केल्यानंतर उपचार पूर्ण झाल्याचे मुलांना सांगण्यात आले. त्यानंतर कासा उपजिल्हा रुग्णालयातील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांना डिस्चार्ज दिला. त्यामुळे वावरे हे त्यांच्या मुलासोबत बाईकवरून घरी जात होते.

घरी जात असतानाच बाईकवर त्यांचा मृत्यू झाला. त्यामुळे घरी जाण्यासाठी कोणतीही व्यवस्था नव्हती. अर्ध्या रस्त्यातच ही घटना घडल्याने रुग्णालयातून रुग्णवाहिका मागवणे शक्य नव्हते. त्यामुळे वावरे यांच्या दोन मुलांनी त्यांना बाईकवरून घरी घेऊन जाण्याचा निर्णय घेतला. आणि त्या दोघांनी मृतदेह चक्क बाईकवरून घरी नेला. दरम्यान, कासा उपजिल्हा रुग्णालयाच्या डॉक्टरांनी वावरे यांच्यावर योग्य उपचार केला नसल्याचा आरोप मुलांनी केला आहे. तसेच संबंधितांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे.