राज्यातील काही शहरांमध्ये Lockdown केले जाऊ शकते, आरोग्यमंत्र्यांची माहिती

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन  –  कोरोना रुग्णवाढ न थांबल्यास राज्यावर लॉकडाऊनची वेळ येऊ शकते. त्यामुळे नागरिकांनी अधिक सावध रहात जबाबदारीने वागण्याची गरज आहे. लॉकडाऊन टाळायचे असेल तर नियम पाळावेच लागतील, असा इशारा राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिला आहे. राज्यात सध्या कोरोना रुग्णांच्या संख्येने उच्चांक गाठला आहे. या पार्श्वभूमीवर आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी पत्रकारांशी संवाद साधला.

टोपे म्हणाले, देशात कोरोना रुग्णांची संख्या वेगाने वाढत असली तरी राज्यात लसीकरणावर अधिक जोर दिला जात आहे. यावेळी त्यांनी गुजरात आणि बंगालमधील व्यवस्थेवर टीका केली. पश्चिम बंगालमध्ये विधानसभा निवडणुकांची तयारी सुरु आहे. तर गुजरातमध्ये आयपीएलचे सामने सुरु आहेत. राज्यामध्ये कोरोनाचा नायनाट करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जात आहेत. राज्यात दिवसेंदिवस रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. रुग्ण संख्या वाढत असताना वेगाने तयारी करावी लागणार आहे. त्यामुळे राज्यातील जम्बो सेंटर पुन्हा सुरु करणे गरजेचे आहे. ज्या जम्बो सेंटरमध्ये स्टाफ डॉक्टर्सची कमतरता आहे, त्या ठिकाणी ते भरण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

राजेश टोपे यांच्या पत्रकार परिषदेतील महत्त्वाचे मुद्दे

– 2400 प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये आणि मेडिकल कॉलेजमध्ये लसीकरण सुरु

– राज्यात लशीचा साठा पडून असल्याची चुकीची माहिती सांगितली जात आहे.

– 45 लाख जणांचं लसीकरण करण्यात आले आहे.

– खासगी रुग्णालयामध्ये 600 ठिकाणी लसीकरणासाठी परवानगी

– गेल्या काळात रुग्णसंख्या पूर्ण रोडावली होती त्यामुळे onboard घेतलेले डॉक्टर रिलिव्ह केले होते.

– राज्यात रोज तीन लाख लशी देण्यात येत आहेत.

– लसीकरणाचा वेग वाढवण्यात येणार

– 73 टक्के चाचण्या आर टी पी सी आर टेस्ट करत आहोत.