Lockdown : ‘लॉकडाऊन’मध्ये अडकून पडलेल्या मातेनं दिला बाळाला जन्म, दोघांची प्रकृती ‘उत्तम’

मुरबाड : पोलीसनामा ऑनलाइन – रिपोर्टर अरुण ठाकरे : लॉकडाऊन मध्ये अडकून पडलेल्या मजुर कुटुंब गेली काही दिवस आपल्या घरी जाण्यास प्रशासनास विनवण्या करत होते त्या मध्ये लहान मुले,वृद्ध,गरोदर माता आपल्या कुटुंबा सह मुरबाड शहरातील कुणबी समाज हॉलमध्ये निगराणीखाली ठेवलेल्या ४२ प्रवाशी मजुरांपैकी आज सकाळी एका गरोदर महिलेची मुरबाडच्या शासकीय रुग्णालयात सुखरूप प्रसूती झाली आहे

दिनांक ३० मार्च रोजी पनवेलवरून जालनाकडे मुरबाड मार्गे जाणारे मालवाहू टेम्पो मुरबाडच्या तीन हात नाका येथे पोलिसांनी चौकशीसाठी अडवले असता त्यात चक्क ४२ मजूर आढळून आले. यात १४ वर्षांखालील १८ मुले तर २४ प्रौढ व्यक्ती असून त्यात २ गरोदर महिला होत्या. मुरबाड तहसील व नगर पंचायतने तात्पुरत्या स्वरूपात उभारलेल्या शहरातील कुणबी समाज हॉलच्या निवारा कक्षात या सर्व कुटुंबाना ठेवण्यात आले असून हे सर्व कुटुंब जालना जिल्ह्यातील वायपांगरी येथील आहेत.

त्यापैकी सोनाली योगेश जाधव (२०) या महिलेने आज सकाळी साडेनऊच्या दरम्यान एका चिमुकलीला मुरबाडच्या शासकीय रुग्णालयात जन्म दिला. बाळाची व आईची प्रकृती सुखरूप असल्याचे तालुका आरोग्य अधिकारी श्रीधर बनसोडे यांनी सांगितले. तर सोनालीला पहिली प्रतिक्षा नावाची दोन वर्षाची मुलगी असून दुसऱ्यांदा कन्यारत्नाचा लाभ झाला असल्याचे तिच्या कुटुंबियांनी सांगितले. चिमुकल्या बाळा सोबत या लॉकडाऊन परिस्थितीत किती दिवस काढावे लागतील याची चिंता आईला असून आई बरोबर बाळाची जबाबदारी आत्ता प्रशासनावर पडली आहे

घराची आस लागलेल्या या मजुर कुटुंबांतील जाधव परिवाराला आज सकाळी दुसऱ्यांदा आनंदाचा सुखद धक्का लाभला आहे. कोरोनाने संपूर्ण जगात थैमान घातले असतांना अशा वादळात जन्म घेतलेल्या या चिमुकलीच्या भावी आरोग्यासाठी सर्वत्र सदिच्छा व्यक्त केल्या जात आहेत.सध्या या ठिकाणी बेचाळीस मजुर होते, मात्र या नव्या बाळामुले निवारा केंद्रातील रहिवाशांची संख्या 43 झाली आहे.