Lockdown : अक्षयतृतियेनिमित्त पुण्यात ‘लपून-छपून’ आंबा खरेदी !

पुणे : प्रतिनिधी – कोरोना व्हायरसचे संकट गडद होत असल्यामुळे लॉकडाऊनचा कालावधी वाढविला आहे. त्यामुळे आज अक्षय तृतियेनिमित्त आंबा खरेदीसुद्धा लपूनछपून केली जात होती. तसेच मिळेल तसा आणि सांगेल त्या भावाने खरेदी करताना नागरिक दिसत होते. जगाच्या इतिहासातील आंबा खरेदी पहिली असावी, अशी चर्चा नागरिकांमध्ये आज सुरू होती.

आज अक्षय तृतीया… घरोघरी गोडधोड जेवणाचा बेत हा ठरलेलाच असतो. मात्र, त्याहून अधिक महत्त्वाचे म्हणजे देशभर लॉकडाऊन असले तरी, सोशल मीडियावर भल्या पहाटेपासून अक्षय तृतीयाच्या खूप खूप शुभेच्छांचा वर्षाव सुरू झाला आहे. त्यामुळे काही प्रमाणात का होईना पण दिलासा मिळाला म्हटले तर वावगे ठरणार नाही. छान रंगीबेरंगी सजवलेली अक्षय तृतिया आणि त्याच्या बाजूचा संदेश वाचतना भावूक झाल्याशिवाय राहवले नाही म्हणून हा पत्रप्रचंच….

मागिल सव्वा महिन्यापासून देशभर लॉकडाऊन असल्यामुळे सर्व व्यवहार ठप्प आहेत. त्यामुळे या वर्षी गुडीपाडवा आणि अक्षयतृतिया देखील नवनवीन खरेदीशिवाय साजरा करण्याची वेळ असल्याचे पोक्त मंडळींसह तरुणांनीही मान्य केले. गजबजलेल्या बाजारपेठांमध्ये सन्नाटा पसरला आहे. अक्षय तृतियेला आंबा खाण्याचा मुहूर्त टळू द्यायचा नाही, असा बहुतेकांचा मानस असतो. तसा यावर्षी लॉकडाऊन असूनही अनेकांनी गुपचूप का होऊना स्वस्त-महाग आंबे खरेदी केल्याचे पाहायला मिळाले.

हडपसरमध्ये कामधेनू इस्टेट आणि नालबंद चाळ येथे हापूस, देवगड, तर काही ठिकाणी हातगाड्यावर लालबाग म्हणून आंब्याची विक्री सुरू होती. पोलिसांचा ससेमिरा चुकविण्यासाठी ताडपत्रीखाली आंब्याच्या पेट्या झाकून एक एक काढून ग्राहकांना दिली जात होती. आंब्याच्या भावामध्ये मात्र कुठलीच तडजोड केली जात नव्हती. प्रत्येकजण चोराच्या हातात पैसे देऊन आंबे खरेदी करीत होता. आंबा कसा आहे, चांगला आहे का, देवगड आहे की हापूस हे विचारायचीसुद्धा चोरी होती. कारण पुढचे ग्राहक लगेच ओरडत होते, तुम्हाला घ्यायचे तर घ्या नाही तर बाजूला व्हा. त्यामुळे कोणीही भाव किंवा आंब्याची प्रत विचारण्याच्या भानगडीत पडत नवहते. आजची आंबा खरेदी काही निराळीच वाटली. एरवी दरवर्षी हापूस आहे, खास रत्नागिरीहून मागविला आहे, तुम्ही आमचे नेहमीचे ग्राहक आहात, अशी आर्जवी भाषा कुठेही दिसत नव्हती, त्यामुळे मनाला वेदनाही होत होत्या.

प्रत्येकाने सावधगिरी बाळगावी….

वेळ नाजूक आहे, जरा सांभाळून राहा… हे युद्ध थोडं वेगळं आहे, त्यामुळे दूर राहून लढा…, घरीच बसा आणि निवांत राहा, कुटुंबाला वेळ देत कोरोनाला हरवू, असा निश्चय करू या, ही जगण्याची लढाई आहे. आपण सर्वजण एकत्र राहून कोरोनाविरुद्ध लढा देऊ, त्यासाठी प्रशासनाच्या निमयांचा आदर करा, असा मार्गदर्शनपर सल्ला पुणे महापालिका शाळा क्र.81-बी च्या मुख्याध्यापिका डॉ. नलिनी चौधरी यांनी दिला.