सोलापूर रस्ता : भाजीपाला दलालांचा नागरिकांच्या जीवाशी खेळ, कवडीपाट टोल नाका-लक्ष्मी कॉलनी दरम्यान भरतो बाजार

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन  – कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये यासाठी मागिल 49 दिवसांपासून लॉकडाऊन आहे. त्यामुळे पुणे शहर आणि उपनगरातील भाजी मार्केट बंद असली, तरी शेतकरी दररोज टेम्पो, ट्रक, छोटा हत्ती भरून भाजीपाला शहरामध्ये विक्रीसाठी आणत असून, त्याची विक्री सोलापूर रस्त्यावर कवडीपाट टोलनाका ते लक्ष्मी कॉलनीदरम्यान होत आहे. शेतकऱ्यांकडून दलाल मंडळी भाजीपाला मध्यरात्रीपासून भल्या पहाटेपर्यंत कवडीमोल दराने खरेदी करतात. त्यामुळे स्थानिक नागरिकांना मानसिक त्रास सहन करावा लागत आहे.

मांजरी उपबाजार ते लक्ष्मी कॉलनीदरम्यान गर्दीच्या ठिकाणी अनेक व्यापारी ट्रॅक्टर किंवा टेम्पो लावून भाजीपाला आणि फळविक्री करीत आहेत. त्यामुळे सोलापूर रस्त्यावर सतत वाहनांची वर्दळ असल्याने अपघाताचा धोका वाढला आहे. ही मंडळी मास्क वापरत नाहीत, सोशल डिस्टन्सिंग किंवा इतर नियमही पाळत नाहीत. त्यामुळे अनधिकृत आणि विनापरवाना फळे आणि भाजीपाला विक्री करणाऱ्यांवर पोलिसांनी कडक कारवाई करावी, अशी मागणी स्थानिक नागरिकांनी केली आहे.

पोलिसांचा बंदोबस्त कमी पडत असल्यानेच दलालांचे फावले आहे. पोलीस आल्याचे समजताच ही मंडळी सोलापूर रस्त्यालगत असलेल्या मांजरी, फुरसुंगी फाटा, शेवाळेवाडी, मांजरी उपबाजार, लक्ष्मी कॉलनीतील अंतर्गत रस्त्यावर वाहने दामटून पळ काढत आहेत. लक्ष्मी कॉलनीतील कालव्यावरील रस्त्यावर बॅरिगेट लावून मोठ्या वाहनांना बंदी केली आहे. तरीसुद्धा रात्रीच्या वेळी ही मंडळी अगोदरच बॅरिगेट हटवून टेवतात, त्यामुळे त्यांना वाहने पळविण्यात अडचण येत नसल्याचे दिसून येत आहे.

कोरोनाबाधित कोणी येऊ नये, स्थानिक नागरिकांना कोणताही त्रास होऊ नये, यासाठी उपनगर आणि लगतच्या गावातील नागरिकांनी अंतर्गत रस्ते मोठ्या वाहनांसाठी बंद केले आहेत. मात्र, दौंड, इंदापूर, बारामती, हवेली तालुक्यातील शेतकरी सोलापूर मार्गे पुण्याकडे भाजीपाला विक्रीसाठी येतात. मात्र, पुण्यातील भाजीमार्केट बंद असल्यामुळे शेतकरी कवडीपाट टोलनाका ते लक्ष्मी कॉलनी दरम्यान भाजीपाल्याची खरेदीविक्री होत आहे. ही बाब स्थानिक नागरिकांच्या आरोग्याला घातक ठरू पाहात आहे. महापालिका आणि लगतच्या ग्रामपंचायतींनी तातडीने सोलापूर रस्त्यावर रात्री-अपरात्री भरणाऱ्या बाजाराचा बंदोबस्त करावा, अशी मागणी स्थानिक नागरिकांकडून केली जात आहे.

शेवाळेवाडीतील स्थानिक नागरिक दत्ता देवकर म्हणाले की, मागिल अनेक दिवसांपासून सोलापूर रस्त्यावर कवडीपाट टोलनाका ते लक्ष्मी कॉलनी दरम्यान भाजीपाला खरेदी-विक्रेत्यांचा बाजार भरत आहे. येथे थांबू नये म्हणून स्ट्रीट लाईट बंद केली आहे. गडबड गोंधळ सुरू झाल्यानंतर पोलिसांना कळविले जाते. मात्र, पोलीस आल्यानंतर काही वेळ बंद होते आणि पुन्हा जैसे थे परिस्थिती निर्माण होते. त्यामुळे स्थानिक नागरिकांना त्रास होत आहे.

दरम्यान, पुणे जिल्हा भाजप युवानेते राहुल शेवाळे म्हणाले की, शेतकरी आणि व्यापाऱ्यांचे संबंध आहेत. त्यामुळे व्यापारी शेतकऱ्यांना फोन करून माल संबंधित ठिकाणी आणण्यासाठी सांगतात. शेतमाल विकला गेला पाहिजे. शहरवासियांना भाजीपाला गरजेचा आहे. त्यासाठी प्रशासनाने योग्य ती उपाययोजना करण्याची गरज आहे. संबंधित ग्रामपंचायत प्रशासनाने पोलिसांना सांगून कारवाई करणे गरजेचे आहे. असे त्यांनी सांगितले.