Lockdown 2.0 : ‘रेल्वे-विमान’ सेवा अन् शाळा देखील बंद, 20 एप्रिलनंतर गावात उघडू शकतात कारखाने, केंद्र सरकारने जारी केले दिशानिर्देश

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – कोरोना व्हायरसमुळे ३ मे पर्यंत केंद्राकडून वाढवण्यात आलेल्या लॉकडाऊन फेज २ बाबत सरकारने बुधवारी नवीन मार्गदर्शक तत्त्वे जाहीर केली असून त्यानुसार, खाण्यापिण्याचे पदार्थ बनवणारे सर्व उद्योग खुले असतील. यासोबतच ग्रामीण भारतात सर्व कारखाने सुरू करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. नव्या मार्गदर्शक सूचनांनुसार मनरेगाच्या कामांनादेखील परवानगी देण्यात आली असून, त्याअंतर्गत सिंचन व जलसंधारणाला प्राधान्य द्यावे असे सांगण्यात आले आहे.

घरातून निघताना मास्क आवश्यक, थुकल्यावर बसणार दंड
नव्या मार्गदर्शक सूचनांमध्ये असे म्हटले आहे की, हे सर्व उपक्रम राज्ये/ केंद्रशासित प्रदेशांद्वारे परवानगी दिल्यानंतर सुरू होतील. तसेच त्यापूर्वी सोशल डिस्टंसिंगचे उपायदेखील घेतले पाहिजेत. COVID-19 च्या व्यवस्थापनासाठी जारी केलेल्या राष्ट्रीय निर्देशानुसार गृह मंत्रालय म्हणते की, सर्व सार्वजनिक ठिकाणी, कार्यस्थळांवर चेहरा कव्हर करणे बंधनकारक आहे. त्याचबरोबर सार्वजनिक ठिकाणी थुंकल्यावर दंड बसेल आणि त्यासाठी दंड आकारला जाऊ शकतो.

शाळा-कॉलेज ३ मे पर्यंत बंद
MHA च्या मार्गदर्शक सूचनांनुसार सिनेमा हॉल, मॉल, शॉपिंग कॉम्प्लेक्स, व्यायामशाळा, स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स, जलतरण तलाव आणि बार ३ मे पर्यंत बंद राहतील. यासोबतच शैक्षणिक संस्था, कोचिंग सेंटर, देशांतर्गत, आंतरराष्ट्रीय हवाई प्रवास, रेल्वे सेवा ३ मे पर्यंत बंद ठेवण्यात येणार आहेत.

बस आणि ट्रेन्स चालणार नाहीत
एका राज्यातून दुसर्‍या राज्यात आणि एका जिल्ह्यातून दुसर्‍या जिल्ह्यात लोकांच्या येण्या-जाण्यावर, मेट्रो, बससेवेवर ३ मे पर्यंत बंदी घालण्यात आली असल्याचे सांगण्यात आले आहे. लॉकडाऊन फेज २ बाबत गृहमंत्रालयाने सांगितले की, ३ मे पर्यंत सर्व सामाजिक, राजकीय, क्रीडा, धार्मिक कार्य, धार्मिक स्थळे जनतेसाठी बंद राहतील.

हॉटस्पॉट क्षेत्रात कोणतीही सवलत नाही
कोरोनाच्या हॉटस्पॉट क्षेत्रात कोणतीही सवलत दिली जाणार नसून या भागात आरोग्य मंत्रालयाने जारी केलेल्या मार्गदर्शक सूचनांचे पालन केले जाईल. तसेच कोणालाही बाहेर पडू दिले जाणार नसून जीवनावश्यक वस्तूंची होम डिलीव्हरी केली जाईल. त्या भागात सुरक्षा कर्मचारी आणि वैद्यकीय कर्मचार्‍यांची ये-जा होईल.

शेतकऱ्यांना मोठा दिलासा
लॉकडाऊनमध्ये शेतकर्‍यांना मोठा दिलासा मिळाला असून शेतीची कामे करण्यास कोणतेही बंधन नाही. शेतीची काम केली जाऊ शकतात. गहू कापू शकता. ते विकू शकता. धान्य खरेदी करणारे बाजार खुले असतील. याशिवाय कापणीशी जोडलेली कृषी वाहने कोणत्याही निर्बंधाशिवाय एका राज्यातून दुसर्‍या राज्यात जाऊ शकतील.