Lockdown : ‘लॉकडाऊन’मध्ये ‘सलून’ चालू ठेऊन लोकांची ‘दाढी-कटिंग’ करणाऱ्या चालकावर पुण्यात FIR, राज्यातील पहिली घटना

पुणे : पोलिसनामा ऑनलाइन –  संचारबंदीत देखील हाजामत करणाऱ्या एका सलूनच्या दुकानावर पोलिसांनी कारवाई केली आहे. दुकान उघडून ग्राहक आत घेतल्यानंतर बाहेरून तो शटर बंद करत होता. शिवाजीनगर परिसरात ही कारवाई केली आहे. गुन्हे शाखा व शिवाजीनगर पोलिसांनी संयुक्त कारवाई केली आहे.

पोलीस शिपाई जी. डी. कर्चे यांनी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यानुसार 188 नुसार जब्बार शेख याच्यावर गुन्हा दाखल केला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, शेख याचे शिवाजीनगर भागातील रामसर बेकरीजवळ ऍगोल सलून नावाचे दुकान आहे. दरम्यान कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अत्यावश्यक सेवा वगळता सर्व दुकाने बंद आहेत. नागरिकांना घराबाहेर पडण्यास मनाई केली आहे. पोलीस देखरेख करत आहेत. मात्र या परिस्थितीत देखील अनेकजण विनाकारण बाहेर पडत आहेत. त्यामुळे पोलिसांकडून कारवाई करण्यात येत आहे.

दरम्यान शिवाजीनगर पोलीस हद्दीत पेट्रोलिंग करत होते. त्यावेळी ते फिरत असताना त्यांना सलूनच्या दुकानाचे शटर बंद होते. पण, त्याला कुलूप नसल्याचे दिसून आले. यामुळे संशय बळावला. त्यावेळी त्यांनी खात्री करण्यासाठी जवळजाऊन पाहिले असता त्यांना आतून आवाज आला. त्याचवेळी खंडणी व अमली पदार्थ विरोधी पथकाचे कर्मचारी संदीप साबळे व पिलाने हेही गस्त घालत येथे आले. त्यांनी विचारपूस केली. यावेळी त्यांनी घटना सांगितली. पोलिसांनी शटर उघडून पाहिल्यानंतर शेख हा दाढी-कटीन करता असल्याचे निदर्शनास आले. पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन त्याच्यावर कारवाई केली आहे.