लॉकडाऊन काळात देखील जेष्ठ नागरिकांना पुणे पोलिसांचा ‘आधार’

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन  –  लॉकडाऊन काळात ज्येष्ठ नागरिकांसाठी पुणे पोलीस आधार ठरत असून, त्यांना जेवणासह इतर मदत केली जात आहे. जेवण आणि गॅस संपल्याबाबत सर्वाधिक मदतीसाठी जेष्ठ नागरिक हेल्पलाइनवर मदत मागत आहेत. 322 ज्येष्ठ नागरिकांनी गेल्या महिन्याभरात हेल्पलाईनवर संपर्क साधला आहे.

पुणे पोलिसांकडून ज्येष्ठ नागरिकांसाठी स्वतंत्र कक्ष स्थापन केला आहे. त्यांच्यासाठी एक स्वतंत्र हेल्पलाईन क्रमांकही आहे. दरम्यान लॉकडाउनमध्ये ज्येष्ठ नागरिकांचे हाल होण्याची शक्यता गृहितधरून 1090 ही हेल्पवाईन व 020-26111103 या क्रमांवर मदतीसाठी फोन करण्याचे आवाहन करण्यात आले होते. तसेच, शहरात एकचे राहणारे 621 व कुटुंबासोबत राहणारे 3160 ज्येष्ठ नागरिकांना फोन करून काळजी घेण्याच्या सूचना दिल्या होत्या. तसेच, अडचण आल्यास हेल्पलाईनवर मदत मागण्यास सांगण्यात आले होते. तर 190 ज्येष्ठ नागरिक संघाच्या व्हॉट्स अपग्रुपच्या माध्यमातून संपर्क ठेवून काळजी घेण्याचे आवाहन केले जात आहे.

गेल्या एका महिन्यात पुणे पोलिसांच्या हेल्पलाईनकडे 322 ज्येष्ठ नागिराकांनी मदत मागितली आहे. त्यामध्ये 42 ज्येष्ठ नागरिकांनी जेवन पाहिजे म्हणून फोन केले आहेत. तर, 28 जणांनी गॅस पाहिजे असल्याची तक्रार नोंदविली होती. तसेच, केअरटेकरसाठी नऊ, औषध 12, हॉस्पिटल 15, भाजी व किरणासाठी 20, पेन्शनसाठी पाच, पोलिस पास 26 व इतर 161 तक्रारी केल्या होत्या. या सर्व तक्रारी तत्काळ स्थानिक पोलिस ठाण्याच्या माध्यमातून सोडविण्यात आल्या आहेत, असे गुन्हे शाखेचे अतिरिक्त आयुक्त अशोक मोराळे यांनी सांगितले.